Shivsena MP Chandrakant khaire manhandled by Maratha kranti morcha mob | Sarkarnama

शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांची धक्काबुक्की

सरकारनामा
मंगळवार, 24 जुलै 2018

औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना आज (ता. 24) संतप्त मराठा आंदोलकांनी धक्काबुक्की करत पिटाळून लावले. काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन मरण पावलेल्या काकासाहेब शिंदे याच्या अंत्यसंस्कारासाठी खैरे सकाळी कायगावला आले होते.

औरंगाबाद : औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांना आज (ता. 24) संतप्त मराठा आंदोलकांनी धक्काबुक्की करत पिटाळून लावले. काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीपात्रात उडी घेऊन मरण पावलेल्या काकासाहेब शिंदे याच्या अंत्यसंस्कारासाठी खैरे सकाळी कायगावला आले होते. पण मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत त्यांना येण्यास मज्जाव केला. यावेळी खैरे यांना गाडीत बसून निघून जा म्हणत काही आंदोलकांनी धक्काबुकी केल्याचा प्रकार देखील घडला. 

गंगापूर तालुक्‍यातील कायगाव येथील गोदापात्रात अठ्ठावीस वर्षीय काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरूणाने उडी घेतली होती. यात त्याच्या मृत्यू झाला. या घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले. 

मराठा आंदोलकांच्या या रागाचा फटका खासदार खैरे यांना देखील बसला. काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर कायगांव येथील जुन्या पुलाजवळ सकाळी अकराच्या सुमारास अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यावेळी मोठ्या संख्येनं मराठा कार्यकर्ते उपस्थित होते. काकासाहेब याच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी खासदार खैरे तिथे पोहोचले. 

मात्र ते आल्याचे कळताच संतप्त आंदोलकांनी त्यांना घेराव घालत पुढे येण्यास विरोध केला. यावेळी काही आंदोलकांनी त्यांना धक्काबुक्की करत गाडीत ढकलण्याचा प्रयत्न केला. परिस्थीती आणखी बिघडू नये याची खबरदारी घेत खैरे तिथून निघून गेले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख