#WomensDay विधानपरिषदेवर मिळालेली संधी हा 'टर्निंग पाॅईंट' : मनिषा कायंदे (व्हिडिओ)

शिवसेनेच्या विधानपरिषद सदस्या मनिषा कायंदे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त 'सरकारनामा'शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या (शब्दांकन - कृष्ण जोशी)
Manisha Kayande Express Feelings about Womens Day
Manisha Kayande Express Feelings about Womens Day

माझे आई वडील आणि दोनही आजोबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करीत असल्याने माझ्यावर लहानपणापासून तसे संस्कार झाले होते. लहानपणापासून मी अटलबिहारी वाजपेयींसारख्या मान्यवरांची भाषणे ऐकायला जात असे. वडील नेत्रतज्ञ असल्याने ते ग्रामीण भागात आरोग्यशिबिरे आयोजित करीत असत, तेथेही मी मदतीसाठी जात असे. अशा प्रकारे लहानपणापासूनच माझ्यात समाजसेवेची आवड निर्माण झाली होती. विल्सन कॉलेजातून एमएससी करताना डॉ. सुधाकर करमरकर हे आमचे गाईड होते. समाजसेवा करायची तर प्रथम शिका, स्वतःच्या पायावर उभे रहा, रिकाम्या खिशाने समाजसेवा करू नका, असे ते नेहमी सांगत.

वडील तीनदा अयोध्येला कारसेवेसाठी गेले होते, १९९२  मध्ये मी देखील त्यांच्याबरोबर गेले होते. या वातावरणाचा परिणाम म्हणून मी तेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे काम करण्यास सुरुवात केली. आधीपासून पाहिले तर साधारण पंचवीस-तीस वर्षे मी भाजपशी संबंधित होते. तेव्हा दादर-नायगाव विभागात महिला कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने मला पक्षात मोठ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. जयवंतीबेन मेहता, सुषमा स्वराज, राजमाता विजयाराजे शिंदे यांच्याबरोबर देखील काम करण्याची संधी मला मिळाली.

१९९७  मध्ये मला पक्षाने दादरमधून नगरसेवकपदासाठी शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली. त्यात मला जेमतेम ३५० मतांनी पराभव पत्करावा लागला, तर २००९ ला सायन कोळीवाडा मधून मी विधानसभा निवडणूकही लढवली. तेव्हा मनसेची लाट असल्याने मला यश मिळू शकले नाही. अर्थात दरम्यानच्या काळात माझे पक्षकाम सुरुच होते. पक्षाची मुंबई महिला आघाडी मी सांभाळली होतीच, या काळात मी विविध प्रश्नांवर शंभर ते सव्वाशे आंदोलने केली. एकदा शिक्षक मतदारसंघातूनही निवडणुक लढवली. अर्थात अशा थेट निवडणुका लढविण्यासाठी पैसे लागतात हे जाणवले.

वेगळी वाट शोधण्याच्या विचारात असताना अचानक २०१२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली व शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ मध्ये पक्षप्रवक्तेपद मिळाले आणि आयुष्यातला टर्निंग पॉईंट २०१८ मध्ये आला. उद्धवजी कधीकधी एकाएकी गुगली टाकत असत, मी तुम्हाला काहीतरी वेगळे काम देणार आहे, काय काम असेल असे वाटते, असेच त्यांनी मला एकदा विचारले. मला काहीच अंदाज लावता आला नाही,  मग त्यांनीच मला विधानपरिषद सदस्य करणार असल्याचे सांगितले. हा माझ्या राजकीय कारकिर्दीतील महत्वाचा  टप्पा होता, राज्यातील महिलांचे प्रश्न मांडण्याची मोठीच संधी मला यामुळे मिळाली. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर 'दिशा' सारखा कायदा करण्याची मागणी मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. ती मान्य झाली व आता याच प्रकारचा कायदा आपल्याकडेही येणार आहे, याचे पुष्कळ समाधान वाटते. विधीमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रश्न मांडताना कामाची प्रचंड संधी उपलब्ध होते, त्यामुळे विलक्षण समाधान मिळते.

याचबरोबर मी महिलांसाठी 'अवनी' या स्वयंसेवी संस्थेमार्फत स्त्री शक्ती केंद्र चालवते आहे.  अन्याय झालेल्या, विषमतेला बळी पडलेल्या महिलांना कायदेसल्ला, कामाची संधी अशी मदत मी करते. आज महिला सर्वच क्षेत्रात आपला  चांगला ठसा उमटवीत आहेत. अजून राज्याच्या मुख्यसचिव पदी किंवा मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी महिला येऊ शकली नसली तरी आता सैन्यदलातही महिलांना उच्चपदी जाण्याची संधी मिळू लागली आहे. हे पाहता असे वाटते की महिलांना अजूनही जास्त संघर्ष करावा लागतो, महिलांना जास्त प्रयत्न करून आपण किती योग्य आहोत, हे जास्त सिद्ध करावे लागते. काही अपवाद जरुर आहेत पण एखादे कठीण काम महिला करू शकेल का, असा संशय घेण्याची मानसिकता असते. अर्थात शिवसेनेत महिलांना पुष्कळ संधी मिळते, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी जसा कधी जातीभेद केला नाही तसाच त्यांनी स्त्री पुरुष भेदभावही केला नाही.

मुंबईची पोलिस आयुक्त, किंवा राज्याची मुख्यसचिव महिला जरुर होईल. सध्या नगरसेवक पदासाठी महिलांना आरक्षण आहे, तसे आमदार-खासदार यांनाही ठेवावे अशीही मागणी होत आहे. मात्र तसे करूनही ते  पद एखाद्या मोठ्या घराण्याच्याच महिलांना मिळाले तर त्याचा सामान्य महिलेला खऱ्या अर्थाने फायदा होणारच नाही. त्यामुळे असे आरक्षण येईपर्यंत राजकीय पक्षांनीच  महिलांना या पदांवर जास्तीत जास्त संधी द्यावी. यासाठी राजकीय  पक्षांनी व पक्षनेत्यांनीच आपल्या मनाची दारे उघडी ठेवावीत. आरक्षणाचा कायदा येईल तेव्हा येईल,  पण तोपर्यंत राजकीय पक्षांनीच महिलांसाठीचा आपला कोटा वाढवावा. अमके क्षेत्र आपल्याला व्यर्ज आहे हा न्यूनगंड मुलींनी बाळगू नये, तसेच स्त्री पुरुष समानतेचा धडा आई वडिलांनीही आपल्या मुलाला द्यावा. स्त्रीयांना अजूनही पुरुषी मानसिकतेविरुद्ध लढा द्यावा लागतो आहे व याबाबतीत अजून पुष्कळ काही करता येण्यासारखे आहे. 

(शब्दांकन - कृष्ण जोशी)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com