Shivsena MLA Bharat Gogavale Supporters Unhappy over Party | Sarkarnama

आमदार गोगावले यांना डावलल्याने शिवसैनिकांत नाराजी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 2 जानेवारी 2020

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तारित मंत्र्यांचा झालेल्या शपथविधीमध्ये शिवसेनेमधून रायगड जिल्ह्यात तीन आमदार निवडून आल्याने आणि जिल्ह्यात शिवसेनेची धार भरत गोगावले यांच्या माध्यमातून सातत्याने जपली गेल्याने मंत्रिपदाची माळ त्यांचा गळ्यात पडणार याची खात्री शिवसैनिकांना होती.

पोलादपूर  : महाड विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा दणदणीत मताधिक्‍याने निवडून येणारे आमदार भरत गोगावले यांना विस्तारित मंत्रिमंडळात मंत्रिपदाची खुर्ची मिळणार अशी महाड मतदारसंघासह रायगडमधील शिवसैनिकांची पक्की खात्री होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विस्तारित मंत्रिमंडळात गोगावले यांना स्थान न मिळाल्याने शिवसैनिकांत नाराजीची लाट उसळली आहे.

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तारित मंत्र्यांचा झालेल्या शपथविधीमध्ये शिवसेनेमधून रायगड जिल्ह्यात तीन आमदार निवडून आल्याने आणि जिल्ह्यात शिवसेनेची धार गोगावले यांच्या माध्यमातून सातत्याने जपली गेल्याने मंत्रिपदाची माळ त्यांचा गळ्यात पडणार याची खात्री शिवसैनिकांना होती.

या साठी विधानसभा निकालानंतर शिवसैनिकांनी बॅनर आणि पोस्टरबाजीद्वारे ठिकठिकाणी त्यांचे मंत्रिपद गृहीत धरून जल्लोष सुरू केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्या वेळी प्रत्येक पक्षातील दोन मंत्र्यांचा शपथविधी झाला. पण, या वेळी शिवसेनेचा बालेकिल्ला रायगड दुर्लक्षित करून मोठा अन्याय करण्यात असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे.

मंत्रीपदाच्या बाबतीत नवनिर्वाचित आमदार अदिती तटकरे यांची राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्रिपदासाठी वर्णी लावण्यात खासदार सुनील तटकरे हे मात्र यशस्वी ठरले. आमदार आदिती तटकरे यांच्या मागे 'गॉडफादर' म्हणून त्यांचे वडील खासदार सुनील तटकरे उभे राहिले तसे आमदार भरत गोगावले यांच्या पाठीशी 'गॉडफादर' ठरू शकणारे रायगड करानी भरभरून मतांचे दान दिलेले नेते का उभे राहिले नाहीत..? असा संतप्त सवाल शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवसेना भवनावर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी धडकणार हे चित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख