सुनील प्रभू घ्यायचे हजेरी, उदय सामंतांकडे चमचमीत जेवणाची जबाबदारी...

 सुनील प्रभू घ्यायचे हजेरी, उदय सामंतांकडे चमचमीत जेवणाची जबाबदारी...

रत्नागिरी : शिवसेना आणि काही अपक्ष आमदारांना मालाड येथील द रिट्रीट या पंचतारांकित हॉटेलमध्ये पाच दिवस ठेवण्यात आले होते. आमदारांच्या भोजनाची सर्व जबाबदारी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्याकडे होती. या चार दिवसात आमदारांनी स्वादिष्ट शाहाकारी व मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेतला. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे खबरदारी म्हणून शिवसेनेच्या आमदारांना मालाडच्या द रिट्रीट या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. 

राज्यात सत्तापेच शिगेला पोहोचला असतानाच शिवसेनेचे आमदार मात्र कोणत्याही दडपणाखाली नव्हते. राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. गेल्या आठवड्यामध्ये मालाड येथील द रिट्रीट या हॉटेलला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांसाठी एकूण 80 खोल्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. प्रत्येक आमदाराला स्वतंत्र खोली होती. त्यामध्ये शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांसाठी दोन खोल्या होत्या. या खोल्या वाटपाची जबाबदारी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, प्रवीण महाले आणि पप्पू सावंत यांच्यावर सोपविण्यात आली होती. 

स्वादिष्ट भोजनानंतर शिवसेना आमदारांसाठी मनोरंजनाची सोय करण्यात आली. यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला. या पाच दिवसात आमदार सूचना देणे, त्यांच्या हजेरीवर सह्या घेणे याची जबाबदारी आमदार सुनील प्रभू यांच्यावर सोपविण्यात आली होती. या पाच दिवसात या हॉटेलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा भेट देवून आमदारांना मार्गदर्शन केले. त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदही घेतली. 

आदित्य ठाकरेही तेथेच 
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आमदार म्हणून तेथेच मुक्काम केला आणि आमदारांशी संवाद साधला. पाच दिवसांच्या सर्व नियोजनात गटनेते एकनाथ शिंदे, रामदास कदम, अनिल देसाई हे लक्ष ठेवून होते. राज्यातील नवीन समीकरणावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्याची परवानगी देण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com