Shivsena Mla Ambadas Danve Takes Review of Aurangabad Corporation and Zilla Parishad | Sarkarnama

अंबादास दानवे यांच्या आढाव्यात औरंगाबाद जिल्हा परिषद पास, तर मनपा नापास

जगदीश पानसरे 
रविवार, 15 डिसेंबर 2019

सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आमदार अंबादास दानवे यांचे निवडून आल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन. त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिकांचे प्रश्न सभागृहात मांडून त्यासाठी अधिकाधिक निधी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे .

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी नुकताच जिल्हा परिषद आणि महापालिकेचा आढावा घेतला.  हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी जिल्हा परिषदेच्या कारभाराचे कौतुक केले तर, दुसरीकडे शिवसेनेचाच महापौर असलेल्या मनपाबाबत मात्र चांगलीच नाराजी व्यक्त केली

सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आमदार अंबादास दानवे यांचे निवडून आल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन. त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिकांचे प्रश्न सभागृहात मांडून त्यासाठी अधिकाधिक निधी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जिल्ह्याच्या राजकारणात खैरे विरुद्ध दानवे असा वाद नेहमी चर्चिला गेला .अगदी लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या झालेल्या पराभावाला अंबादास दानवे यांचा देखील हातभार होता असे आरोप केले गेले. मात्र या आरोपांचा कुठलाही परिणाम त्यांच्यावर किंवा पक्षश्रेष्ठीं वर झाला नाही. उलट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांना झुकते माप देत थेट विधान परिषदेचे तिकीट देऊन निवडूनही आणले. तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणात दानवे 'दादा' ठरले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार केला तर जिल्हा परिषद अंबादास दानवे यांच्याकडे तर महापालिकेवर चंद्रकांत खैरे यांचे वर्चस्व असे चित्र आतापर्यंत पाहायला मिळाले .परंतु खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि दानवे यांना विधान परिषदेची लागलेली लॉटरी यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण काहीशी बदलली आहेत.

संघटन कौशल्य आणि पक्षाच्या धोरणानुसार वेगवेगळ्या योजना राबवत अंबादास दानवे यांनी आपले वजन मातोश्रीवर वाढवले आहे .त्यांची दहा रुपयात पोटभर जेवण देण्याची शिवभोजन योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत .अशावेळी जिल्ह्याच्या राजकारणावर आपली मजबूत पकड राहावी यासाठी अंबादास दानवे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

दोन दिवसांपूर्वी दानवे यांनी जिल्हा परिषदेत जाऊन तेथील कामांचा आढावा घेतला . ग्रामीण भागातील रस्ते, दलित वस्ती सुधारचा निधी, पाणीपुरवठा योजना आदी सगळ्यांचा आढावा दानवे यांनी घेतला .अखर्चित निधी परत जाण्याची जिल्हा परिषदेचे परंपरा असल्यामुळे सहाजिकच या संदर्भात दानवे यांना पत्रकारांनी विचारले . तेव्हा मात्र आता कुठल्याच विभागाचा निधी परत जाणार नाही, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांनीच व्यक्त केला.
 शिवाय जिल्हा परिषदेचा कारभार अत्यंत उत्तमरित्या सुरू आहे , अधिकारी देखील चांगली कामे करतात मात्र, त्यांची बदनामी होते असे म्हणत जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांना एक प्रकारे शाबासकी दिली. 

महापालिकेचे वाभाडे काढले

जिल्हा परिषदेचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी अंबादास दानवे महापालिकेत गेले. तेथील योजना, रखडलेली कामे पाणी , कचरा आदी समस्यांचा आढावा घेतला. परंतु, महापालिकेचा कारभार चुकीच्या पद्धतीने हाकला जात असून त्यामुळे जनता शिवसेनेवर नाराज होते असे म्हणत त्यांनी थेट महापौर नंदकुमार घोडेले यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली .घोडेले हे चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात .त्यामुळे दानवे यांनी आढाव्याच्या निमित्ताने घोडेले यांचे देखील चांगलेच कान टोचले. विशेषता महापालिकेचे फुगवन तयार करण्यात आलेल्या बजेट वरून त्यांनी महापौरांना चांगलेच फैलावर घेतले .

फुगलेल्या बजेटमुळे नागरिक खुश होतात, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही हे जेव्हा लक्षात येते तेव्हा, मात्र त्याचा फटका पक्षाला बसतो. या बजेट विरोधात जर एखादी व्यक्ती न्यायालयात गेली, तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल असा  इशाराही द्यायला विसरले ते विसरले नाही. दानवे  एवढ्यावरच थांबले नाही,  तर महापालिकेत कंत्राटदारांची बिले काढून देण्याचा धंदा केला जातो असा खळबळजनक आरोप करत नवनियुक्त महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी यात लक्ष घालावे अशी सूचनाही केली. गेली पंचवीस वर्ष महापालिकेची सत्ता शिवसेनेकडे आहे , मात्र हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे पक्ष आणि महापालिकेची मोठ्या प्रमाणावर बदनामी होत असल्याने अंबादास दानवे यांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जाते .

परंतु, खैरे समर्थक घोडेले यांना लक्ष करण्यासाठीच दानवे यांनी आढाव्याचा हा खटाटोप केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे . पुढील सहा महिन्यांनी महापालिकेची निवडणूक होणार आहे, या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी महापौरांची खरडपट्टी करत आपल्याच पक्षाला दिलेला घरचा आहेर भविष्यात किती परिणामकारक ठरेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख