Shivsena ministers confused on mla expulsion | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या गोंधळात सेना नेते बुचकळ्यात 

गोविंद तुपे: सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 22 मार्च 2017

कर्जमाफीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आमदारांवर केलेली निलंबनाची कारवाई असर्मथनीय असल्याचे आदेश मोतीश्रीवरून आल्यानंतर शिवसेना नेत्यांचा सूर बदलला. परंतू निलंबनाची कारवाई झाली त्यावेळी सभागृहात शिवसेनेने का भूमिका घेतली नाही आणि उद्या शिवसेना सभागृहात निलंबन मागे घ्या असा ठराव मांडणार का याप्रश्‍नांवरून शिवसेनेचे नेते मात्र पुरते गांगारून गेलेत. 

मुंबई:  शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या यामागणीवर आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाच्या 19 आमदांचे निलंबन करण्यात आले. या निलंबनाचे शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी स्वागत केले होते. मात्र कर्जमाफीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आमदारांवर केलेली निलंबनाची कारवाई असर्मथनीय असल्याचे आदेश मोतीश्रीवरून आल्यानंतर शिवसेना नेत्यांचा सूर बदलला. परंतू निलंबनाची कारवाई झाली त्यावेळी सभागृहात शिवसेनेने का भूमिका घेतली नाही आणि उद्या शिवसेना सभागृहात निलंबन मागे घ्या असा ठराव मांडणार का याप्रश्‍नांवरून शिवसेनेचे नेते मात्र पुरते गांगारून गेलेत. 

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीसाठी अर्थसंकल्प मांडत असताना अडथळा निर्माण करणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 19 आमदारांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत निलंबित करण्यात आले आहे. त्यातच शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी निलंबनाच्या विरोधात भूमिका घेतल्याने शिवसेना नेत्यांची पुरती गोची झाली होती. कारण शिवसेना भाजप विरोधात असताना कॉंग्रेस राष्ट्रवादीनेही अशीच वागणूक दिली होती. त्यामुळे त्याचा आज वचपा काढला आहे अशा गप्पा काही शिवसेना नेते विधानभवन परीसरात मारत होते. मात्र अचानक पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे गप्पांना मुरड घालत भाजप विरोधाचा अजेंडा बाहेर काढावा लागला आहे. 

विशेष म्हणजे शिवसेनेने सभागृहात या गोष्टीला का विरोध केला नाही. आणि असे जर असेल तर शिवसेना उद्या सभागृहात निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव मांडणार का? शिवसेना सत्तेत असतानाही मग याची सेनेला माहिती कशी नव्हती? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आग्रही भूमिका घेत शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का? या प्रश्‍नांवर बोलताना शिवसेना आमदार विजयराव औटी यांनी या निलंबनाचे समर्थन करीत नसल्याचे सांगत शेतकऱ्यांची कर्जमाफी हा अजेंड्यावरील पहिला विषय आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या आमदारावर कारवाई होत असेल तर आम्ही त्याचा विरोधच करणार. तर याबाबतची रणनिती आज रात्री आम्ही तयार करून यावर उद्या भाष्य करू असे आमदार सुनिल प्रभू यांनी सांगितले. मात्र एकूणच बदलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेची पुरती कोंडी होत असल्याचे शिवसेना नेत्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख