shivsena ministers | Sarkarnama

निवडणुकीच्या संग्रामात शिवसेनेचे निम्म्याहून अधिक मंत्री फेल

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

मुंबई  मिनी विधानसभा म्हटल्या गेलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये ठाण्याच्या एकनाथ शिंदेचा अपवाद वगळता शिवसेनेच्या जवळपास सर्व मंत्र्यांनी सुमार कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. ठाण्यात मात्र गेल्यावेळेपेक्षा जास्त जागांवर यश मिळवून एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीची वाहवा मिळवली आहे. 

मुंबई  मिनी विधानसभा म्हटल्या गेलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये ठाण्याच्या एकनाथ शिंदेचा अपवाद वगळता शिवसेनेच्या जवळपास सर्व मंत्र्यांनी सुमार कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. ठाण्यात मात्र गेल्यावेळेपेक्षा जास्त जागांवर यश मिळवून एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीची वाहवा मिळवली आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची कामगिरी राज्यभरात उजवी ठरली असताना शिवसेनेला मात्र जेमतेम ठाणे महापालिकेत व काही जिल्हा परिषदांमध्ये यश मिळाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा सेना नेतृत्वाकडे भाव वधारला आहे. सेनेचे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई यांच्या गोरेगाव पश्‍चिमेतील नगरसेवकपदाच्या सर्व जागा या पालिका निवडणुकीत सेनेने गमावल्या.

दुसरे ज्येष्ठ मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांची जबाबदारी होती, पण या जिल्ह्यांत सेनेची कामगिरी यथातथाच झाली. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे संघटनेची विदर्भातील जबाबदारी होती, पण विदर्भात सेनेच्या पक्षप्रमुखांपासून सावंतांपर्यंत सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने संघटनेला पूर्ण अपयश आले. तसेच दीपक केसरकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात, दादा भुसे यांना मालेगावमध्ये अपयशाचे धनी व्हावे लागले. त्याचप्रमाणे जालन्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जळगावात गुलाबराव पाटील यांचीही कामगिरी जेमतेमच होती.

मात्र पर्यावरण मंत्री रामदास कदम, राज्यमंत्री संजय राठोड, रवींद्र वायकर यांची त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील कामगिरी उत्तम झाली आहे. 

मंत्र्यांवर शिवसैनिक नाराज 
आधीपासूनच शिवसैनिक सेनेच्या मंत्र्यांवर नाराज आहेत. त्यात आता बहुतेक मंत्री अपेक्षित कामगिरी करण्यात कमी पडल्याने सैनिकांची मंत्र्यांबाबतची नाराजी प्रचंड वाढली आहे. स्वतःच्या प्रभावक्षेत्रातील जागा निवडून न आणू शकणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या, अशी शिवसैनिकांची भावना प्रबळ व्हायला लागली आहे. विशेषतः सुभाष देसाई, दीपक केसरकर, डॉ. दीपक सावंत यांच्या विरोधातील सैनिकांच्या भावना तीव्र आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख