Shivsena Minister Dada Bhuse Rakshbandhan | Sarkarnama

राज्यमंत्री दादा भुसे म्हणतात.....बहिणीसाठी आजही मी लहानच, कान धरुन चुका सांगते 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 26 ऑगस्ट 2018

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे व सध्या शिवसेनेचे राज्यमंत्री असलेले दादा भुसे यांना परिसरातील, मतदारसंघातील असंख्य महिला राखी बांधतात. रक्षबंधनाच्या दिवशी त्यांच्याकडे दिवसभर वर्दळ असते. त्यांना तीन बहिणी आहेत. या बहिणींबाबत ते मोठ्या उत्साहाने सांगत असतात.

मालेगाव : मला तीन बहिणी. त्यातील एकीचे निधन झाले. दोघी नियमीत रक्षाबंधनाला राखी बांधतात. आज मी राज्यमंत्री झालोय. मात्र, माझी मोठी बहिण मला लहानच समजते. काय खायचे? कुठे फिरतो? कुटुंबाला वेळ देतो की नाही? प्रकृतीची काळजी घेतो की नाही? या तिच्या अशा असंख्य प्रश्‍नांना उत्तरे द्यावीच लागतात. जोपर्यंत ज्ञानाच्या चार गोष्टी सांगून होत नाहीत ती थांबत नाही. ती राखी बांधते तेव्हा अशी बहिण व तिचे प्रेम पाहून अंगावर मुठभर मास चढते, ज्याला अशी बहिण असते त्यापेक्षा श्रीमंत कोण? अशी माझी भावना होते.....राज्यमंत्री दादा भुसे आपल्या भगिनींबद्दल सांगत होते. 

रक्षाबंधनानिमित्त बोलताना ते म्हणाले, "मला तीन बहिणी. लहान बहिण अलका बच्छाव नाशिक महापालिकेच्या शाळेत शिक्षिका होती. तिचे पाच वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले. ती अतीशय प्रेमळ अन्‌ सेवाभावी संस्कार असलेली होती. मधली बहिण विठाबाई यादवराव पवार यांचे सासर बेज (कळवण) येथे आहे. ते शेतकरी कुटुंब आहे. त्यांचे पती यादवराव पवार निवृत्त शिक्षक आहेत. मोठी बहिण काशीबाई मोहनराव देवरे. तीच्या पतींचे निधन झाले आहे. उमराणे (ता. देवळा) येथील जुन्या पिढीतील मोठे प्रस्थ असलेले नेते (कै.) ज्ञानदेव दादा देवरे यांची ती सून. ज्ञानदेव दादांचे राजकीय, सहकार, सामाजीक क्षेत्रात एकेकाळी मोठे काम होते. जिल्हा बॅंकेपासून तर विविध सहकारी व अन्य संस्थांचा कारभार ते पाहात असत. त्यांचा राजकीय, सामाजिक वारसा घरातील सून म्हणुन काशीबाईनेच सांभाळला होता. आत्ताच्या तुलनेत दहापटीने त्यांचे काम होते. ते सर्व सांभाळण्याचे काम आमच्या बहिणीने केले. मालेगावपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर तीचे सासर होते. परंतु, वर्षभरात दिवाळी व रक्षाबंधन अशा दोन वेळाच ती माहेरी येत असे.'' 

ते पुढे म्हणाले, "आत्ता घरी भावाच्याही लहान मुली आहेत. परिसरातील, कॉलनीतील महिला नियमीतपणे राखी बांधण्यास येतात. मात्र, माझ्या दोन्ही बहिणी न चुकता रक्षाबंधनास आवर्जून येतात. त्यांचे जे प्रेम आहे ते शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. बहिण बहिणच असते. आज मी मंत्री असलो तरीही त्यांच्या दृष्टीकोणातुन मी लहानच आहे. शारिरीक काळजी कशी घेतली पाहिजे. कौटुंबिक प्रश्‍न, घरच्या लोकांना वेळ देतो का? घरासाठी, मुलांबरोबर वेळ घालविणे कसे आवश्‍यक आहे. इथपासुन तर काय चुकले हे देखील कान पकडुन सांगणारी माझी मोठी बहिण आहे. बहिणीचे हे कर्तव्य मोठ्या अधिकाराने, तेव्हढ्याच ममतेने अन्‌ प्रेमाने ती बजावते. तिच्या त्या अधिकारापुढे मी आजही मला मी किती लहान आहे याची जाणीव होते. हे लहानपण आजन्म टिकावे. त्यातील अवर्णनीय जीव्हाळा अन्‌ सुखाची सावली ज्या भावाला मिळते त्यापेक्षा नशीबवान कोण असणार? त्या बाबतीत मी खूपच नशिबवान आहे"

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख