नाशिक - लाखाच्या आघाडीमुळे 'पश्चिम'च्या उमेदवारीसाठी गिरीश महाजन, संजय राऊत समर्थकांत जागेसाठी स्पर्घा?

लोकसभा निवडणुकीत नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात युतीच्या मतांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १९ हजार ९१५ मतांची वाढ झाली आहे. सध्या पश्‍चिम मतदारसंघ भाजपकडे असला, तरी युती झाल्याने शिवसेनेकडून हा मतदारसंघ मागण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
नाशिक - लाखाच्या आघाडीमुळे 'पश्चिम'च्या उमेदवारीसाठी गिरीश महाजन, संजय राऊत समर्थकांत जागेसाठी स्पर्घा?

नाशिक  : लोकसभा निवडणुकीत नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात युतीच्या मतांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत १९ हजार ९१५ मतांची वाढ झाली आहे. सध्या पश्‍चिम मतदारसंघ भाजपकडे असला, तरी युती झाल्याने शिवसेनेकडून हा मतदारसंघ मागण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. विद्यमान आमदार भाजपचा असल्याने भाजपकडूनदेखील या मतदारसंघावर दावा सांगितला जाईल. त्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांचे समर्थक नगरसेवक सुधाकर बडगुजर उमेदवारीसाठी दावेदार असल्याने मतांची आघाडी युतीत वादाचे कारण ठरण्याची चिन्हे आहेत. 

नाशिक लोकसभा मतदारसंघात दोन लाख ९१ हजार अशा विक्रमी मतांनी विजयी झालेल्या शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना शहरी भागातील मतदारांनी चांगला लीड दिल्याने त्यांना विक्रम प्रस्थापित करता आला. त्यातही पश्‍चिम मतदारसंघात तब्बल एक लाख १७ हजार १२७ मतदान युतीच्या पदरात पडले. त्यामुळे आता विधानसभेसाठी येथून दावेदारीला प्रारंभ झाला आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला तब्बल ९७ हजार २१२  मते मिळाली होती. या मतदारसंघात २०१४ मध्ये युतीचे हेमंत गोडसे यांना ५७ हजार मतांची आघाडी होती. यंदा ती ७७ हजार मतांवर गेली.

त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक याच भागातून निवडून आले, तर पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचा विचार करता भाजपच्या नगरसेवकांची संख्यादेखील शिवसेनेच्या नगरसेवकांइतकीच होत आहे. आमदार सीमा हिरे भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जाते. मात्र तरकीही पक्षात महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील, सातपूर मंडल अध्यक्ष, नगरसेवक शशिकांत जाधव, प्रदीप पेशकार इच्छुक आहेत. तसा संदेश ते सातत्याने सोळ मिडीयावर देत आहेत. शिवसेनेकडून नगरसेवक सुधाकर बडगुजर, शिवाजी चुंभळे, दिलीप दातीर, विलास शिंदे, डी.जी. सूर्यवंशी हे इच्छुक आहेत. 

विधानसभा निवडणुकीत युती होईल अशी दाट शक्‍यता आहे. त्यात हा मतदारसंघ भाजपला की शिवसेनेला असा पहिला वाद निर्माण होईल. कदाचित तो शिवसेनेचे संजय राऊत आणि भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील वाद- विवादाचा विषय ठरतो की काय अशीही चर्चा आहे. त्यातही दोघांपैकी एका पक्षाला जागा मिळाली तरी अंतर्गत इच्छुकांची संख्यादेखील अधिक असल्याने उमेदवारीचा तिढा आहे. कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com