'बालहट्टा' मुळे शिवसेनेने गमावला कल्याण ग्रामीणचा गड

Ramesh mhatre raju patil
Ramesh mhatre raju patil

ठाणे :  कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा शिवेसना भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. गेली अनेक वर्षे या मतदार संघातून युतीने चांगले यश मिळविले आहे. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना सुरुवातीला उमेदवारी देण्यात आली.

त्यांनी अर्जही भरला मात्र अचानक ठाण्यातून सुत्रे हलली आणि रमेश म्हात्रे यांना ही उमेदवारी देण्यात आल्याचा निर्णय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अचानक जाहीर केला. वरिष्ठांना हा निर्णय फारसा रुचला नाही, परंतू 'बालहट्ट' पुरवित म्हात्रे यांनाच उमेदवारी देण्यात आली. तेव्हाच म्हात्रे यांचा पराभव निश्चित झाला. बालहट्टामुळेच शिवसेनेने कल्याण ग्रामीणचा गड गमावला असल्याची चर्चा गुरुवारी कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.

गेले दोन तीन वर्षापासून कल्याण ग्रामीण मतदारसंघात रमेश म्हात्रे यांनी आपले पाय रोवण्यास सुरुवात केली होती. कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या होत्या. हे वरिष्ठांना माहित असूनही या गटबाजीकडे त्यांनी दुर्लक्ष केले. या मतभेदाचे दर्शन निवडणुक काळात उमेदवारी मिळविण्यावरुन रंगलेल्या चढाओढीत दिसून आले. भोईर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास पक्षातील वरिष्ठांनी भाग पाडले. खासदार शिंदे यांनी रमेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करताच भोईर गटात नाराजी पसरली ती अखेर पर्यंत कायम राहीली.

सेनेतील गटबाजी सोबतच भाजपामध्येही गटबाजी होती. भाजपाच्या नेत्यांनी छुपे पणाने मनसेचे राजू पाटील यांना समर्थन देत आपला 'शेजारधर्म' पाळला. प्रचाराचा सर्व काळ हा पक्षातील नाराजी दूर करण्यात खर्ची झाला.

कल्याण डोंबिवली महापालिकेत 27 गावातील 21 नगरसेवकांपैकी 18 नगरसेवक हे महायुतीचे असूनही सेनेला येथे दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. युतीचा सात हजाराच्या फरकाने मनसेने पराभव केला असला तरी युतीच्या कार्यकर्त्यांना मात्र तो फारसा जिव्हारी लागल्याचे दिसले नाही. पराभव हा निश्चित होता हीच चर्चा त्यांच्या तोंडी होती. 

लोकसभा निवडणुकीत मनसेने पडद्याआडून युतीला पाठिंबा दिला होता. त्याची परतफेड विधानसभा निवडणुकीत करण्यात आली आहे. ही सीट मनसेला देणे हे आधीच निश्चित असल्यानेच म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेली अशीही चर्चा रंगली होती. तर भोईर गटात मात्र बालहट्टामुळे शिवसेनेने कल्याण ग्रामीणचा गड गमावला, भोईर यांना उमेदवारी दिली असती तर आमचा विजय निश्चित होता असे कार्यकर्ते उघडपणे बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com