भाऊसाहेब कांबळे उमेदवार नकोच! : शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विरोध; राजीनाम्याचा इशारा 

भाऊसाहेब कांबळे उमेदवार नकोच! : शिवसेना पदाधिकाऱ्यांचा विरोध; राजीनाम्याचा इशारा 

श्रीरामपूर : आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाला विरोध नाही; त्यांच्या उमेदवारीला विरोध आहे. विरोध डावलून त्यांना उमेदवारी दिल्यास पदाधिकारी राजीनामे देतील,' असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. किती शिवसैनिक सोबत आहेत, हे दाखविण्यासाठी कांबळे यांनी शिवसेनेचा मेळावा घ्यावा, असे आव्हानही या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
 
खासदार सदाशिव लोखंडे यांनी ही पत्रकार परिषद बोलाविली होती; मात्र तेच उपस्थित नव्हते. या वेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मात्र भूमिका स्पष्ट केली. ज्येष्ठ नेते अशोक थोरे, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र देवकर, तालुका उपप्रमुख राजू तांबे, प्रदीप वाघ, मदन हाडके, शरद भणगे, महिला आघाडीप्रमुख ज्योती सुधीर वायखिंडे, शुभांगी अतुल शेटे, सचिन तांबे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
 
लोकसभा निवडणुकीत खासदार लोखंडे यांच्या विरोधात उमेदवारी करणाऱ्या आमदार कांबळे यांना तालुक्‍यातून मिळालेले मताधिक्‍य 23 हजारांनी कमी होते. त्यांच्या गावातील केंद्रावरही कमी मते होती. (स्व.) जयंत ससाणे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कांबळे यांनी फसविले. सेवानिवृत्त शिक्षण संचालक रामचंद्र जाधव, लहू कानडे, डॉ. चेतन लोखंडे हे सक्षम उमेदवार असून, कांबळे यांच्याऐवजी यांपैकी कोणाच्याही उमेदवारीस आमचा विरोध नाही. मात्र, कांबळे यांना उमेदवारी देऊ नये. यासाठी दहा हजार स्वाक्षऱ्यांचे निवेदन प्रवेशाच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. तरीदेखील उमेदवारी दिलीच, तर त्यांचा पाडाव करू, असे या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
 
मुंबईतील बैठकीत शहराध्यक्ष सचिन बडदे व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे हे दोघे कांबळेंसमवेत होते. खेवरे यांच्याकडे संगमनेर, अकोले व राहाता या तालुक्‍यांचा पदभार आहे. तालुक्‍याचा पदभार राजेंद्र झावरे यांच्याकडे असून, त्यांच्यासह संपर्कप्रमुख आमदार नरेंद्र दराडे यांनाही विश्वासात घेण्यात आले नाही. खेवरे व बडदे यांनी चुकीची माहिती दिल्याने पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अथवा आमची माहिती चुकीची असेल तर आमच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणार आहोत. तालुक्‍यात शिवसेना पक्ष वाढू नये, यासाठी येथील काहींचा प्रयत्न असल्याची टीकाही पदाधिकाऱ्यांनी या वेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com