... आणि शिवसेना नगरसेविकेने भिंतीवर डाेके आपटले !

केंद्रे यांचे बोलणे जिव्हारी लागल्याने रागाच्या भरात गायके यांनी भिंतीवर डोके आपटून घेतले. त्यानंतर भोवळ येऊन त्या सभागृहात कोसळल्या.
Aurangabad-corporator.
Aurangabad-corporator.

औरंगाबाद : महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने शिवसेनेच्या नगरसेविका मीना गायके बुधवारी (ता.11) सर्वसाधारण सभेत संतप्त झाल्या. त्यांच्यावर आत्ताच कारवाई करा, अशी मागणी करताना त्यांचा राग अनावर झाला .

कारवाई करा अन्यथा सभागृहातच आत्महत्या करेन, असा इशारा त्यांनी दिल्याने महापालिकेत एकच खळबळ उडाली. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही, केंद्रे यांचे बोलणे जिव्हारी लागल्याने रागाच्या भरात गायके यांनी भिंतीवर डोके आपटून घेतले. त्यानंतर भोवळ येऊन त्या सभागृहात कोसळल्या.

सर्वासाधारण सभेच्या बैठकीत बुधवारी (ता.11) सकाळच्या सत्रात श्रीमती गायके यांनी त्यांच्या वॉर्डातील दूषित पाणीप्रश्न मांडून जलवाहिनीच्या दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र कंत्राटदार बीले मिळत नसल्याने कामे करण्यास तयार नाहीत, बिले देण्यात यावीत अशी मागणी सभागृहात करण्यात आली होती. दुपारी सभा तहकुब झाल्यानंतर पुंडलीकनगर वार्डाच्या शिवसेना नगरसेविका मीना गायके लेखाधिकारी केंद्रे यांच्या दालनात गेल्या होत्या.

तहकुब सभा पुन्हा सुरु झाल्यानंतर गायके वारंवार सांगुनही केंद्रे ऐकत नव्हते. त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला केंद्रेनी अपानास्पद वागणूक दिल्याचा आरोप गायके यांनी केला. तेव्हा त्यांना रडू कोसळले. त्यांच्यावर आजच कारवाई करा, अन्यथा मी सभागृहातच आत्महत्या करेन, असा इशारा दिल्यानंतर महापौरांनी केंद्रे यांना सभागृहात बोलावले.

तोपर्यंत वातावरण खूपच तापले होते. सर्वजण गायके यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मी आता शांत बसणार नाही. पक्षाची सत्ता असूनही कामे होत नाहीत, असे म्हणत सर्व नगरसेविका महापौरांच्या डायसजवळ जमल्या. महापौरांनी वातावरण तापल्याचे लक्षात येताचा विषयपत्रिका मंजुरीसाठी घेत विषयपत्रिकेतील प्रतिनियुक्‍तीवर आलेले केंद्रे यांना शासनाकडे परत पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर केला व त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगीतले.

केंद्रे सभागृहाबाहेर जात असताना चिडलेल्या नगरसेविका गायके यांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यांना आवरण्यासाठी महिला सुरक्षारक्षक सरसावल्या. यावेळी गायके यांना अडवत महिला सुरक्षा रक्षकांनी जागेवर बसवण्याचा प्रयत्न केला.

पण संतापलेल्या गायके यांनी जवळच्या भितींवर डोके आपटत आपला राग व्यक्त केला. या प्रकारामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. अन्य नगरसेवकांनी गायके यांची समजूत काढत त्यांना जागेवर बसवण्यासाठी नेले तेव्हा चालतांनाच त्यांना भोवळ आली आणि त्या पडल्या. रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

सभागृहातील गोंधळानंतर महापौरांनी मुख्य लेखाधिकारी केंद्रे यांच्यावर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांची स्वतः आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच केंद्रेना परत शासनाकडे पाठविण्याचा 1152 क्रमांकाचा प्रस्ताव मंजुर करत त्यावर कार्यवाही करण्याचेही आदेश दिले. तसेच यापुढे अधिकाऱ्यांनी महिला नगरसेविकांशी नम्रतेने वागण्याची ताकीद देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com