तानाजी सावंतांना मोजावी लागली मनमानीची किंमत? 

सांगोला व बार्शी वगळता अन्य मतदारसंघातील पक्षाअंतर्गत बंडखोरी थोपविण्यात सावंत बंधूंना अपयश आल्याने चार जागा गमवाव्या लागल्या. उमेदवारी देताना व पदाधिकाऱ्यांच्या निवडीतही सावंत यांनी हस्तक्षेप केल्याचा फटका पक्षाला बसल्याची चर्चा आहे.
Tanaji Sawant Kept Away from Cabinet Expansion
Tanaji Sawant Kept Away from Cabinet Expansion

सोलापूर : मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात हुकलेली आमदार तानाजी सावंत यांना दुसऱ्या टप्प्यात मंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र, खेकड्यामुळे धरण फुटल्याच्या वक्‍तव्याचा रोष तर जिल्हा समन्वयक तथा तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांच्याबद्दल पक्षातील पदाधिकाऱ्यांमधील नाराजीचा फटका जिल्ह्यात शिवसेनेला सहन करावा लागला. जिल्ह्यात पाच आमदार विजयी होतील असा विश्‍वास असतानाही एकमेव जागा मिळाली. त्यामुळेच तानाजी सावंत यांची मंत्रिपदाची संधी हुकल्याची चर्चा सुरु आहे.

धानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात मोहोळ, शहर मध्य, करमाळा, बार्शी व सांगोला, अशा पाच ठिकाणी शिवसेनेचे आमदार विजयी होतील असा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना विश्‍वास होता. मात्र, सांगोला व बार्शी वगळता अन्य मतदारसंघातील पक्षाअंतर्गत बंडखोरी थोपविण्यात सावंत बंधूंना अपयश आल्याने चार जागा गमवाव्या लागल्या. उमेदवारी देताना व पदाधिकाऱ्यांच्या निवडीतही सावंत यांनी हस्तक्षेप केल्याचा फटका पक्षाला बसल्याची चर्चा आहे. माढ्याचे विद्यमान आमदार बबनराव शिंदे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे हे दोघेही शिवसेनेकडून निवडणूक लढण्यास इच्छूक असतानाही सावंत यांनी स्वत:च्या फायद्यासाठी त्यांना नकार दिल्याचीही चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे.

महामंडळासाठी तीन नावांची चर्चा

शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेकडे 27 महामंडळे देण्यात आली आहेत. माजी आमदार दिलीप माने, आमदार शहाजी पाटील यांना राज्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापुरने राज्याला केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यासह अन्य तगडे मंत्री दिले. मात्र, सोलापूर जिल्ह्याला शिवसेनेकडून एकही मंत्रिपद मिळालेले नाही. 

या पार्श्‍वभूमीवर आता शिवसेनेच्या वाट्यातील महामंडळांसाठी जिल्ह्यातील तीन नावांची चर्चा आहे. त्यामध्ये आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दिलीप माने व जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांचा समावेश आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांना अनेकदा सोलापूर दौऱ्यावर घेऊन आलेल्या वानकरांना संधी मिळेल अशी चर्चा आहे. तर आमदार पाटील व माजी आमदार माने यांचेही पारडे जड मानले जात आहे.

बंधू शिवाजी सावंत यांच्याबद्दल नाराजी

शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार प्रा. तानाजी सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पद आहे. दोघांनाही विधानसभा निवडणुकीत करमाळा, मोहोळ, बार्शी, शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात आमदार निवडून आणण्याची संधी होती. जुन्या नव्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मोट बांधून नाराजी दूर करण्याची आवश्‍यकता होती. मात्र, करमाळा, शहर मध्य, मोहोळ या मतदारसंघात बंडखोरी रोखण्यात त्यांना अपयश आले आणि शिवसेनेच्या उमेदवारांना पराभव सहन करावा लागला. 

दुसरीकडे पक्षात सक्रिय नसलेले, यापूर्वी कोणतेही पद न भुषविलेल्या हरिभाऊ चौगुले यांना शहरप्रमुख पद दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्‍त केली. तर करमाळा व शहर मध्यमध्ये विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांना डावलून अन्य उमेदवारांना संधी दिल्याचाही फटका पक्षाला बसल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळाले नसल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com