Shivsena keeps BJP on waiting | Sarkarnama

शिवसेनेने भाजपला ठेवले व्हेंटिलेंटरवर 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 मार्च 2017

सरकारमध्ये असून शिवसेनेला मिळणारी दुय्यम वागणूक, मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी खालच्या स्तराला जाऊन नेतृत्वावर केलेली टिका शिवसेना विसरलेली नाही. या अपमानाचा बदला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या वेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करुन घेण्याचा निर्णय स्थानिक शिवसेना नेतृत्वाने केल्याची जोरदार चर्चा आहे.

औरंगाबाद : मुंबई महापौर निवडणुकीतून माघार घेण्याच्या बदल्यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेने सत्ता व अध्यक्षपदासाठी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा भाजपला आहे.

पण आतापर्यंत मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरलेल्या शिवसेनेला भाजपसोबत बॅकसीटवर बसणे काही केल्या रुचतांना दिसत नाहीये.

सरकारमध्ये असून शिवसेनेला मिळणारी दुय्यम वागणूक, मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी खालच्या स्तराला जाऊन नेतृत्वावर केलेली टिका शिवसेना विसरलेली नाही. या अपमानाचा बदला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या वेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करुन घेण्याचा निर्णय स्थानिक शिवसेना नेतृत्वाने केल्याची जोरदार चर्चा आहे.

औरंगाबाद, जालन्यात सर्वाधिक जागांसह भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेनेने त्यांना अद्याप व्हेंटिलेटरवरच ठेवल्याचे चित्र आहे. 

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप राज्यात नंबर एकचा पक्ष ठरला. पण मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, हिंगोली हे तीन जिल्हे वगळता इतर ठिकाणी भाजपला जेमतेम यश मिळाले. जालना व औरंगाबादमध्ये भाजपचे अनुक्रमे 22 व 23 सदस्य निवडूण आले आहेत. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर गेल्यामुळे सहाजिकच सत्तेचा सर्वप्रथम दावा भाजपकडून केला जाणार आहे. पण बहुमत नसल्यामुळे भाजपला शिवसेनेची साथ घ्यावी लागणार आहे. मुंबई महापौरपदाचा तिढा सुटल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीत युती करायची की नाही याचा निर्णय मुंबईतील वरिष्ठ नेते घेणार होते. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी दिलेल्या टाळीकडे शिवसेनेने दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे. 

भाजपला सत्ता दूरच 

कुठल्याही परिस्थीती भाजप सोबत जायचे नाही अशी मानसिकता मराठवाड्यातील शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरून देखील भाजपला सध्या तरी सत्ता दूरच म्हणावी लागेल.

62 सदस्य असलेल्या औरंगाबाद जिल्हा परिषदेत भाजपचे 23 तर शिवसेनेचे 18 सदस्य निवडूण आले आहेत. हे दोन पक्ष एकत्र आल्यास इथे भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो, शिवसेनेला सोबत घेतल्या शिवाय भाजपला दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही. बहुमताचा 32 हा आकडा राष्ट्रवादी, मनसे व अपक्ष असे पाच सदस्य सोबत घेऊन देखील भाजपला गाठता येणार नाही. तर भाजपला डावलून शिवसेनेचा अध्यक्ष करण्याचे गणित कॉंग्रेसच्या 16 सदस्यांच्या जोरावर सोडवण्याच्या जोरदार हालचाली दोन्ही बाजूंनी सुरु आहेत. यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे विशेष परवानगी मागितल्याचे देखील कळते. कॉंग्रेस देखील शिवसेनेच्या सोबत जाण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाते. 

जालन्यातही चकवा देण्याची तयारी 

औरंगाबाद प्रमाणेच जालना जिल्हा परिषदेत देखील शिवसेना भाजपला चकवा देण्याच्या तयारीत आहे. 56 सदस्य असलेल्या जालना जिल्हा परिषदेत 22 जागांसह भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे. तर 14 सदस्यांसह शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथेही शिवसेना सोबत असेल तरच भाजपला सत्तेचे फळ चाखता येणार आहे.

पण अर्जून खोतकर व रावसाहेब दानवे या दोन पक्षांच्या नेत्यांमधील बिघडलेले संबंध पाहता हे शक्‍य होणार नाही अशी परिस्थीती आहे. शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करायची असेल तर भाजपपुढे राष्ट्रवादी हा एकमेव आशेचा किरण आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास भाजपचे 22 व राष्ट्रवादीचे 13 सदस्य मिळून बहुमत सिध्द होऊन भाजपचा अध्यक्ष विराजमान होऊ शकतो. पण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आम्ही भाजप सोबत जाणार नाही असे या आधीच स्पष्ट केले आहे. तर कॉंग्रेसची साथ न घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

त्यामुळे भाजप समोर शिवसेना हाच एकमेव पर्याय आहे. शिवसेनेसाठी मात्र सर्वच पर्याय खुले असून राष्ट्रवादी 13 व कॉंग्रेसच्या 5 सदस्यांची साथ घेऊन जालना जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवण्याचे जोरदार प्रयत्न अर्जून खोतकर यांनी चालवले आहेत. नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसला केलेली मदत आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी थेट शरद पवार यांनाच गळ घातल्यामुळे हे समीकरण जुळून येण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 

हिंगोलीत भाजपकडून कोंडी 

हिंगोली जिल्हा परिषदेत गेल्यावेळी शिवसेनेची बहुमतासह सत्ता होती. यावेळी मात्र भाजपने जोरदार मुंसडी मारत 10 सदस्य निवडूण आणले आहेत. 15 सदस्यांसह इथे शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सत्तेसाठी त्यांना भाजपशी हातमिळवणी करावी लागणार आहे. पण इतर ठिकाणी शिवसेना काय भूमिका घेते यावरच सगळे काही अवलंबून राहणार आहे.

बहुमतासाठी 27 सदस्यांचा पाठिंबा आवश्‍यक आहे. शिवसेना-भाजपचे संख्याबळ 25 होते. त्यांना आणखी 2 सदस्यांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे. अपक्ष गळाला लागल्यास सत्तेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे प्रत्येकी 12 सदस्य असल्यामुळे अपक्षांच्या साथीने ते देखील बहुमत गाठू शकतात. सत्ता मिळू शकते तिथे एकत्र येण्याचा निर्णय झाल्यामुळे अपक्षांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न कॉंग्रेस-राष्ट्रवादीने देखील सुरु केले आहेत. औरंगाबाद-जालन्याची सत्ता भाजप शिवाय मिळवायची असेल तर शिवसेनेला हिंगोलीवर पाणी सोडावे लागण्याची शक्‍यता आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख