आपला आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल : शरद पवार

पवारांनी शिवसेनेला मोठेपणा देत वेगळी गुगली टाकली आहे का?
आपला आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल : शरद पवार

बारामती शहर : भाजप व शिवसेनेत जो सत्तेचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे उध्दव ठाकरे म्हणाले याचा अर्थ 50-50 टक्के त्यांच जे काही ठरल असेल त्या पध्दतीने होईल, मात्र मागच्या वेळेस शिवसेनेच्या चार दोन गोष्टी त्यांच्याकडून गेल्या. शिवसेना या वेळेस काही सहन करतील असे दिसत नाही, आपला आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल, असे मला वाटते, असे सूचक विधान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. 

बारामतीतील गोविंदबाग या त्यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. सत्तेत सहभागी होणार का,या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, शेतक-यांचे प्रश्न भीषण झाले आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत, हजारो लोकांच्या हाताचे काम जात आहे,  या सह राज्यापुढे इतरही अनेक प्रश्न आहेत, हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी जनमत तयार करण्याच्या कामावर राष्ट्रवादी कॉंग्रेस संघटनात्मक पातळीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे. 

मुख्यमंत्र्यांवर टीका....
या निवडणूकीचे स्वरुप मुख्यमंत्र्यांनी वेगळे करण्याचा प्रयत्न केला. लढाईच नाही, असेच तिचे स्वरुप करण्याचा प्रयत्न केला. समोर लढायला कुणी नाहीच, एकतर्फीच आहे, लोकांनाही अस वाटल की एकतर्फीच निवडणूक आहे. निवडणूकीला सामोरे जाताना पक्षाला प्रभावी भूमिका मांडता आली नाही तर लोकांना दोष देता येणार नाही, ती आमची कमतरता असेल. ही कमतरता भरुन काढण्यासाठी यंदा आव्हान आहे आणि त्याला आपण सामोरे गेले पाहिजे, मी तसा गेलो आणि राज्यातील तरुणाईने मला प्रचंड प्रतिसाद दिला, याचा आनंद आहे. 

राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना दोष देता येणार नाही, असे स्पष्ट करुन शरद पवार म्हणाले की महाराष्ट्र हा माझा घरचा भाग असल्याने येथे प्रचार ही माझी जबाबदारीच होती. मी हरियाणात प्रचाराला गेलो नाही कारण तेथे आमची स्थिती मजबूत नाही, परिस्थिती वेगळी होती. सोनियांची प्रकृती ठीक नव्हती व राहुल गांधीनी काही सभा घेतल्या. 

साताराच्या निकालाबाबत बोलताना पवार म्हणाले, सत्तेत सहभागी होण्यासाठी पक्षांतर झाल, विरोधी पक्षात राहून आपण सत्तेत सहभागी होऊ शकणार नाही हे दिसल्यानेच पक्षांतर केले गेले व लोकांना हेच पटले नाही त्यामुळे आमच्या बाजूने लोकांनी कौल दिला, असे पवारांनी उदयनराजे यांचा नामोल्लेख टाळून सांगितले. 

लोकसभेच्या वेळेस जे चित्र दिसले होते ते वंचित बहुजन आघाडीचे चित्र यंदा दिसले नाही, त्यांचा प्रभाव हळुहळू कमी होताना दिसत आहे, असेही पवार म्हणाले. 

राज्यातील मतदारांनी विरोधकांना सन्मानाची जागा दिली, सन्मानजन्य अशा लोकांना निवडून दिले, लोकांनी आमच्याकडून ज्या अपेक्षा ठेवल्या आहेत त्याची पूर्तता करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करु, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. 
रोहित पवार विजयानंतर राम शिंदे यांना भेटण्यासाठी गेल्याने एक नवीन चांगला पायंडा पडला. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की आम्ही राजकारणात नेहमीच सुसंस्कृतपणा ठेवला, सभ्यता जपली, कटुता येऊ देत नाही, निवडणूक संपल्यावर सगळे एकच असतात. 1977 मध्ये बापूसाहेब काळदाते आमच्याविरोधात बोलायचे ते निवडूनही आले, पण जेवायला मुक्कामाला ते माझ्या घरी असत. आपण सुसंस्कृत आहोत. आपण हे जपायला हवे. राम शिंदे यांनी सत्तेत राहून कामे केली, वडीलकीच्या नात्याने त्यांच्या सदिच्छा घेणे, हे माझ्या दृष्टीने सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. 

व्यक्तिगत मला, सुप्रिया सुळे, अजित पवार, रोहित पवार यांना बारामतीकरांनी जे प्रचंड प्रेम दिले, प्रतिष्ठा व नावलौकीक मिळवून दिला, याही निवडणूकीत राज्यात सर्वाधिक मते अजित पवारांना दिली, या मुळे आमच्या डोक्यावरील जबाबदारीचे ओझे वाढले असून भविष्यात या जबाबदारीची पूर्तता करणे हे आमचे काम असून आम्ही ते अखंडपणाने करत राहू, अशी ग्वाही शरद पवार यांनी बारामतीकरांना दिली आहे. 

बारामतीच्या निकालाबाबत बोलताना पवार म्हणाले की विरोधी उमेदवार हाच मुळात बाहेरचा होता, व्यक्तिगत टीकाटीपण्णी बारामतीकरांना आवडत नाही याचीच निकालाने प्रचिती आली असेही ते म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com