shivsena is like goat says ramdas athawale | Sarkarnama

वाघासारख्या शिवसेनेची शेळी झालीय : रामदास आठवले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणार नाहीत. त्यामुळे ते बांगलादेशी लोकांना येथून घालविणार नाहीत. कॉंग्रेसच्या दबावाला बळी पडून शिवसेनेने हा निर्णय घेतला असून केवळ सत्तेसाठी कॉंग्रेसच्या दबावाखाली काम करत आहे, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला. 

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणार नाहीत. त्यामुळे ते बांगलादेशी लोकांना येथून घालविणार नाहीत. कॉंग्रेसच्या दबावाला बळी पडून शिवसेनेने हा निर्णय घेतला असून केवळ सत्तेसाठी कॉंग्रेसच्या दबावाखाली काम करत आहे, असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केला. 

सध्या महाविकास आघाडीत अनेक मुद्‌द्‌यांवर मतभेद होत असताना सत्तेसाठी गुलामगिरी करण्याचे काम शिवसेनेकडून होत असून वाघासारखी असलेली शिवसेना शेळीसारखी झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

सातारा येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होत. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड उपस्थित होते.

आठवले म्हणाले, नागरीकत्व कायद्याबाबत मुस्लिम समाजात जाणीवपूर्वक गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न कॉंग्रेस, कम्युनिस्ट व विरोधी पक्षांकडून सुरू आहे. यातून मुस्लिम समाजाची डोकी भडकविण्याचे काम होत आहे. हा कायदा आपल्या देशातील मुस्लिमांविरोधात नाही. विरोधकांना गेल्या साडेपाच वर्षात आंदोलन करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे कॉंग्रेसने या कायद्याचा आधार घेऊन मुस्लिम समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

मंत्रीमंडळाच्या विस्तारात मित्रपक्षांना डावलले आहे, याबाबत तुमची भुमिका काय, या प्रश्‍नावर आठवले म्हणाले, शिवसेना सर्वांना बरोबर घेऊन काम करू शकत नाही. त्यांना फक्त कॉंग्रेस, राष्ट्रवादीची सोबत हवी आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी बांगलादेशींना महाराष्ट्रातून हाकलून लावावे. संजय राऊतच्या माध्यमातून आम्ही लोकसभेत व मुंबईत ही मागणी मागे केली होती. पण ठाकरे महाराष्ट्रात नागरीकत्व कायद्याची अंमलबजावणी करणार नाहीत. त्यामुळे ते बांगलादेशी लोकांना येथून घालविणार नाहीत. 

ठाकरे सरकार कॉंग्रेसच्या दबावाला बळी पडत असून स्वत:ची भुमिका सोडून सत्तेसाठी कॉंग्रेसच्या दबावाखाली काम करत आहे, असा आरोप करून आठवले म्हणाले, त्यांनी त्यांच्या भुमिकेत बदल करू नये. सावरकारांच्या बाबतीत अत्यंत कठोर भुमिका राहूल गांधींनी घेतली होती. ही भुमिका घेऊनही शिवसेनेने ऍडजेस्टमेंट केली आहे. त्यामुळे विचार सोडून युती झाली असेल तर त्या युतीची माती झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या अनेक मुद्‌द्‌यांवर या तिघांत मतभेद होत असताना सत्तेसाठी गुलामगिरी करण्याचे काम शिवसेनेकडून होत आहे. वाघासारखी असलेली शिवसेना शेळीसारखी झाली आहे. सत्ता चालवायची असेल तर शिवसेनेने भाजप व रिपब्लिकन पक्षासोबत यायला हवे. भविष्यात भाजप, शिवसेना व रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकत्र येईल, असे भाकित करून सध्याचे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही, असे सुतोवाच त्यांनी केले.

सध्याच्या मंत्री मंडळात गोतावळाच अधिक आहे, याबाबत तुमचे मत काय आहे, याविषयावर अधिक बोलणे टाळून आठवले म्हणाले, घराणेशाही सर्वच पक्षात आहे, पण केवळ रिपब्लिकन पक्षात नाही, असे मिश्‍किलपणे सांगितले.
आज तुम्ही थोडे नाराज दिसता, असे विचारल्यावर श्री. आठवले यांनी आपण नाराज नसल्याचे सांगताना, मी नाही नाराज, म्हणून साताऱ्यात आलोय मी आज... अशी कविता सादर केली. 

ठाकरे म्हणाले, आम्ही सरकार बनविले असते तर रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मंत्री झाला असता. काही कार्यकर्त्यांना महामंडळावर संधी मिळाली असती. पण महामंडळी ही गेले आणि नियुक्‍त्याही गेल्या निवडणुकीनंतर मी भाजपपुढे तीन वर्षे भाजपने व दोन वर्षे शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद ठेवावे, अशा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्यांनी या प्रस्तावाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे राज्यात दुसरा पर्याय उभा राहिला. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी ते बिनखात्याचे मंत्री असल्याने इतर मंत्र्यांवर मोठी जबाबदारी आली आहे.

महामंडळांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन
कर्जमाफीत दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्यांचा समावेश नाही. ही शेतकऱ्यांची फसवणूक असून सरसकट सातबारा कोरा करण्याचा शब्द त्यांनी पाळावा अन्यथा सरकारचा सातबारा कोरा करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आता शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले आहे. आता विविध मागासवर्गीय महामंडळांचेही कर्जमाफ करावे. यासाठी येत्या दहा जानेवारीला रिपब्लिक पक्षातर्फे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने करण्यात येणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख