सेनेने चाबूकस्वारांची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपचा हिरमोड

युतीच्या औपचारिक घोषणेपूर्वीच शिवसेनेने पितृपक्ष संपताच रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात सर्व ६१ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली.त्यात पिंपरीचे आमदार अॅड गौतम चाबूकस्वार यांचा समावेश आहे. त्यामुळे पिंपरीवर दावा केलेल्या भाजपचा हिरमोड झाला आहे.यामुळे शहरातून पहिला उमेदवारी अर्ज शिवसेनेचा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Gautam Chabukswar Gets AB Form From Uddhav Thakrey
Gautam Chabukswar Gets AB Form From Uddhav Thakrey

पिंपरी : युतीच्या औपचारिक घोषणेपूर्वीच शिवसेनेने पितृपक्ष संपताच रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात सर्व ६१ विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली.त्यात पिंपरीचे आमदार अॅड गौतम चाबूकस्वार यांचा समावेश आहे. त्यामुळे पिंपरीवर दावा केलेल्या भाजपचा हिरमोड झाला आहे.यामुळे शहरातून पहिला उमेदवारी अर्ज शिवसेनेचा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, पिंपरी शिवसेनेने कायम ठेवल्याने भाजप आमदार असलेला चिंचवड व भोसरी (सहयोगी सदस्य) हे मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच शिवसेनेचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरीवर केलेला क्लेमही यामुळे उडाला आहे.

आज दुपारीच भाजपचे खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत पिंपरीवर दावा केला होता. कार्यकर्त्यांची ती मागणी असल्याचे ते म्हणाले होते. मात्र,पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील,तो मान्य असेल,असेही त्यांनी स्पष्ट केले होते. यावेळी पिंपरीतील पक्षाचे दोन इच्छुकही हजर होते. तर साबळे यांच्या कन्येनेही इच्छुक म्हणून पिंपरीतून मुलाखत दिली होती. मात्र, त्यांच्या या दाव्यानंतर लगेचच तासाभरात मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांची बैठक वांद्रे येथील आपल्या मातोश्री निवासस्थानी घेतली. तेथे सर्वच आमदारांना  त्यांनी एबी फॉर्मचे वाटप केले. त्यात पिंपरीच्या आमदारांचाही समावेश आहे.

गेले काही दिवस पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला मिळेल की भाजपला असे वातावरण होते. तसेच २०१४ मध्ये भाजपने ही जागा आपीआयला (आठवले गट)सोडली होती. या पार्श्वभूमीवर 'आरपीआय'ने या जागेसाठी जोरदार प्रयत्न चालविले होते. शिवसेनेचे एक विद्यमान नगरसेवक व युवा सेनेचे एक पदाधिकारी देखील इच्छूक होते. मात्र, चाबूकस्वार यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवित ठाकरे यांनी त्यांना एबी फॉर्म हातात देत 'पक्ष तुमच्या पाठिशी आहे, कामाला लागा, निवडून या' असे म्हणत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शिवसेनाच नाही,तर भाजपच्याही इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. इतरही बहुतांश आमदारांना यावेळी ठाकरे यांनी एबी फॉर्म दिले,असे चाबूकस्वार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com