Shivsena gathering workers in Byculla & Mumbadevi | Sarkarnama

भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघात शिवसेनेत इनकमिंग 

मिलिंद तांबे 
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

भायखळा आणि मुंबादेवी हे मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणुन ओळखले जातात. 2014 च्या निवडणुकीत थोड्या मतांच्या फरकाने शिवसेनेला पराभव पत्करावा लागला होता.

मुंबई : शिवसेनेने मुंबईवर आपलं लक्ष केंद्रित केले असून प्रत्येक जागेवर विजय संपादन करण्याचा प्रयत्न आहे. यातील भायखळा आणि मुंबादेवी या मुस्लिम बहुल मतदारसंघातील मतांची कमतरता भरून काढण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन माजी नगरसेवकांना आपल्या गळाला लावलं आहे.

या दोघांचा गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करणार असून यामुळे शिवसेनेला या दोन मतदार संघात फायदा होणार आहे.

भायखळा आणि मुंबादेवी हे मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणुन ओळखले जातात. 2014 च्या निवडणुकीत थोड्या मतांच्या फरकाने शिवसेनेला पराभव पत्करावा लागला होता. यामुळे शिवसेनेने अल्पसंख्यांक मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सुरुवात केली आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात  'अल्पसंख्यांक देश प्रेमी मुसलमानांचं आम्ही स्वागत करतो' असं वक्तव्य करून अल्पसंख्यांक मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. याच अल्पसंख्यांक मतदारांच्या जोरावर आपले उमेदवार थोड्याफार मतांनी जिंकून येऊ शकतात हे गणित उद्धव ठाकरेंना कळले.

या दोन्ही मतदारसंघातील अल्पसंख्यांक मतांवर डोळा ठेवून मुंबईतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना प्रवेश देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. दक्षिण मुंबईतील मुंबादेवी भेंडी बाजार आणि भायखळा ताडवाडी परिसरात निवडून येणारे माजी नगरसेवक मनोज जमसुटकर आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत गुरुवारी मातोश्रीवर पक्ष प्रवेश आहे. या पक्ष प्रवेशामुळे भायखळा आणि मुंबादेवी या मतदारसंघाची गणित बदलतील असं सांगण्यात येते.

काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जमसुटकर यांची पत्नी सध्या विद्यमान काँग्रेसच्या नगरसेविका आहेत.त्यांचा प्रभाव मुंबादेवी आणि भायखळा मतदारसंघावर असल्यामुळे त्यांना प्रवेश देण्याचे निश्चित करण्यात आले आहे तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सूर्यकांत पाटील यांचा भेंडीबाजार या परिसरात अल्पसंख्यांक मतदारावर प्रभाव असल्यामुळे त्यांनाही शिवसेनेत प्रवेश देण्यात येणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख