भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेची महिला आघाडी सरसावणार 

शिवसेनेकडे राज्य पातळीवर महिला नेत्यांची पक्षाकडे वाणवा आहे. ही उणीव भरून काढत महिला व युवतींच्या रूपाने समाजातील मोठा वर्ग शिवसेनेकडे खेचण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी शिवसेनेने नियोजनपूर्वक पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेची महिला आघाडी सरसावणार 

पुणे : शिवसेना म्हणजे तरूण आक्रमक कार्यकर्त्यांची फळी. मात्र यात महिला व युवतींचा ओघ तुलनेने अल्प ही प्रतिमा बदलून महिला-युवतींचा ओढा संघटनेकडे वाढावा यासाठी महिला आघाडी अधिक सक्षम करण्याचे धोरण शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आखले आहे. 

या धोरणाचा भाग म्हणून जिल्हानिहाय महिला आघाडीसाठी स्वतंत्र संपर्कप्रमुख नेमण्यात आले आहेत. पुण्यासाठी तृष्णा विश्‍वासराव यांची संपर्कप्रमुख नेमणूक करण्यात आली आहे. विश्‍वासराव या मुंबई महापालिकेत विद्यमान नगरसेविका असून या पूर्वी त्यांनी सभागृहनेत्या म्हणून काम केले आहे. 

महागाईला विरोध करण्यासाठी शिवसेनेकडून राज्य सरकारचा निषेध करीत सध्या राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात उद्या (26 सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनातही महिला आघाडी अग्रभागी ठेवण्यात आली आहे. महिलांच्या पुढाकारानेच राज्यभरात आंदोलन करण्याचे नियोजन आहे. पक्षाच्या प्रवक्‍त्या व विधानपरिषदेतील प्रतोद डॉ. नीलम गोऱ्हे सोडल्या तर पक्षाकडे आक्रमक असा महिला चेहरा नाही. मुंबईत पक्षाच्या अनेक नगरसेविका आहेत. त्यातील अनेक महिलांना महापौर होण्याची संधी मिळाली आहे. मात्र हे नेतृत्व मुंबईपुरतेच सिमीत आहे. 

राज्य पातळीवर महिला नेत्यांची पक्षाकडे वाणवा आहे. ही उणीव भरून काढत महिला व युवतींच्या रूपाने समाजातील मोठा वर्ग शिवसेनेकडे खेचण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न आहे. पुण्याच्या पातळीवर पूर्वी राधिकाताई हरिश्‍चंद्रे यांनी महिला आघाडीची जबाबदारी समर्थपणे पार पाडली आहे. त्या अनेक वर्षे शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख होत्या. सध्या निर्मलाताई केंडे या महिला आघाडीप्रमुख म्हणून काम करीत आहेत. 

पुण्यात उद्या काढण्यात येणाऱ्या मोर्चात शिवसैनिकांच्या बरोबरीने महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी व्हाव्यात यासाठी संघटनेच्या पातळीवर जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यापुढील काळात पुण्यात महिला आघाडीचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी विद्यमान महिला पदाधिकाऱ्यांबरोबरच आजी-माजी महिला नगरसेविकांना सक्रिय होण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. 

भारतीय जनता पक्षाशी लढत द्यायची असेल तर पक्षाची महिला आघाडी भाजप इतकीच सक्षम करण्याचे पक्षाचे नियोजन आहे. मुंबईत महिला आघाडीचे संघटन मोठे आहे. त्या पद्धतीने काम पुणे व राज्याच्या इतर शहरात करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे या सूत्रांनी सांगितले.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com