shivsena criticizes modi over his speech | Sarkarnama

पंतप्रधानाने किती खालच्या पातळीवर बोलायचे : शिवसेनेचा सवाल

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे : तीन राज्यांतील भाजपचा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव आहे. तो त्यांनी विनम्रतेने स्वीकारावा असा सल्ला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून दिला आहे. राहुल गांधी यांच्या विनम्रतेचे कौतुक करत दुसरीकडे मोदी यांना शालजोडीतून फटके लगावण्यात आले आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने किती खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करायचा, असा सवाल विचारण्यात आला आहे. 

पुणे : तीन राज्यांतील भाजपचा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव आहे. तो त्यांनी विनम्रतेने स्वीकारावा असा सल्ला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून दिला आहे. राहुल गांधी यांच्या विनम्रतेचे कौतुक करत दुसरीकडे मोदी यांना शालजोडीतून फटके लगावण्यात आले आहे. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने किती खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करायचा, असा सवाल विचारण्यात आला आहे. 

`राहुल गांधी यांनी विजय नम्रपणे स्वीकारला. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. मोदी तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींचे देश उभारणीतील योगदान मानायला तयार नाहीत. भाजप उभारणीतले लालकृष्ण आडवाणी व इतर कुणीच त्यांना मान्य नाहीत. असा अहंकार फक्त महाभारतात दिसला होता, पण त्याचाही पराभव झाला, असा इशारा देण्यात आला आहे. 

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणे म्हणजे महात्मा गांधी यांचे काँग्रेस बरखास्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासारखेच आहे अशी टीका तेव्हा मोदी-शहांसारख्या दिग्गजांपासून ते भाजपातील गल्लीबोळातील पोरेटोरेही करीत होती. ‘काँग्रेसमुक्त हिंदुस्थान’चे नारे देऊन त्यांचे घसे कोरडे पडत होते व देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला रोज श्रद्धांजली वाहिली जात होती. या सगळ्यांना राहुल गांधी यांनी त्यांच्या घरात घुसून मारले आहे. काँग्रेसला जे श्रद्धांजली वाहताना थकत नव्हते ते सगळे अचानक मूकबधिर झाले आहेत. मोदी हे विष्णूचा तेरावा अवतार तर शहा हेच मूळ चाणक्य आहेत. त्यामुळे पुढची शे-पाचशे वर्षे या दोन शूरवीरांचा पराभव होणार नाही आणि हे दोन वीर पुनः पुन्हा अवतार घेत राहतील व राज्य करतील असे त्यांच्या भक्तांना वाटत होते, असा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

आमच्या देशात तेहतीस कोटी देव आहेत व देवही एकमेकांशी ‘सत्य धर्म’ यासाठी लढत होते हे भक्तगण विसरले. पाच राज्यांत जे महाभारत घडले त्यात पांडव कोण, कौरव कोण या फंदात आम्हाला पडायचे नाही, पण अन्याय आणि असत्याचा पराभव झाला. गर्वहरण झाले व अहंकारही मारला गेला. श्री. मोदी यांनी आता सांगितले की, ‘हार-जीत जीवनाचा भाग आहे. भाजप जनादेश नम्रतेने स्वीकारीत आहे. पराभवाबरोबर विजयही नम्रतेने स्वीकारणे हीच आमची संस्कृती आहे.’ 

पण 2014 नंतर ही संस्कृती व विनम्रता देशातून नष्ट झाली. ज्यांनी पक्ष घडवला ते अडगळीत गेले. ज्या मित्राने संकटकाळात साथ दिली ते शत्रू ठरवले गेले. ज्या जनतेने तुम्हाला धुळीतून शिखरावर नेले त्याच जनतेचा कडेलोट झाला. हे राज्य व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी चालवले व आता ते पेंढाऱ्यांचे राज्य बनले. पाचपैकी एकाही राज्यात मोदी व शहा विजय मिळवू शकले नाहीत. कारण जनतेला व्यापारी नको आहेत, असे अग्रलेखात म्हटले आहे.

पंतप्रधान पदावरील व्यक्तीने किती खालच्या पातळीवर जाऊन बोलावयाचे याचे भान ठेवले नाही. नोटाबंदीपासून ते 95 वर्षांच्या आईचा मुद्दा प्रचारात येतो व त्यावर भावनिक बोलून मते मागितली जातात. लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोदी हे प्रचारात उतरले नसते तर हा पराभव स्थानिक नेतृत्वाचा व अंतर्गत तिकीट घोटाळ्याचाच ठरला असता. पण पंतप्रधान सर्व फौजफाटा घेऊन उतरले. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ प्रचारात उतरवले, त्यामुळे हा पराभव पंतप्रधानांचाच आहे. त्यांनी तो आता विनम्रतेने स्वीकारला. 

त्यातही अहंकार आहे. त्यांनी मोठ्या विजयाबद्दल राहुल गांधींचे अभिनंदन केले नाही. संसदेत राहुल गांधी यांनी मोदी यांना आलिंगन दिले तेव्हा ‘ही काय जबरदस्ती?’ असे गोंधळलेले भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. कोण राहुल गांधी? असे त्यांना वाटले. कोण गांधी, कोण बादल, कोण ठाकरे, कोण जनता? सर्वकाही मी आणि मीच आहे. त्या मीपणाचा पराभव शक्तिमान जनतेने केला, असे मत यात नोंदविले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख