सत्तेतून बाहेर पडून दाखवा, नवाब मलिकांचे शिवसेनेला आव्हान 

सत्तेतून बाहेर पडून दाखवा, नवाब मलिकांचे शिवसेनेला आव्हान 

मुंबई : केंद्रात आणि राज्यातही सरकारमध्ये बसायचे. जनतेच्या प्रश्‍नावर मौन धारण करायचे आणि जनतेसमोर मात्र आंदोलनाची भाषा करायची ही शिवसेनेची दुटपी भाषा राज्यातील जनतेने ओळखली आहे. यामुळे येत्या काळात शिवसेनेच्या ही दुटप्पी भूमिका राज्यातील जनता स्वीकारणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. त्यांनी प्रथम सरकारमधून बाहेर पडून दाखवावे असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी केले. 

शिवसेनेच्या दिवसभर झालेल्या बैठकीसोबत राज्यात निर्माण झालेल्या लोडशेडिंगच्या संदर्भात मलिक यांनी भाजपासोबतच शिवसेनेच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली. 
2014 च्या लोकसभा निवडणूकीत प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा धरणाची उंची वाढवण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, हे काम पूर्ण झाल्यावर 400 कोटी रूपयांची वीज महाराष्ट्राला पुरवली जाईल असेही आश्वासन त्यांनी दिले होते. आता या धरणाचे काम पूर्ण झाले असून ती वीज का मिळत नाही, असा सवाल त्यांनी केला. 

मलिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या वचनांकडे लक्ष द्यावे आणि महाराष्ट्राच्या वाट्याची वीज राज्यात आणावी अशी मागणीही केली. 
शिवसेनेच्या आज दिवसभर झालेल्या आमदार, मंत्री यांच्या बैठकांतील गोंधळावरही मलिक यांनी टीका केली. ते म्हणाले की, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात नवरात्रीदरम्यान आंदोलन करणार असल्याचे कळले. शिवसेना नक्की केंद्रात आणि राज्यात सरकारमध्ये सहभागी आहे का, हेच कळत नाही. 

दरम्यान, आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या मुंबई तालुका निरीक्षक व पदाधिकारी यांची राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माजी आमदार अशोक धात्रक, माजी आमदार मिलिंद कांबळे, उपाध्यक्ष लक्ष्मण पुजारी, प्रदेश प्रतिनिधी प्रशासन सुधाकर वड्डे, सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व तालुका निरीक्षक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com