Shivsena Congress members under Ramdas kadam"s watch | Sarkarnama

शिवसेना-कॉंग्रेस सदस्यांवर रामदास भाईंचा वॉच 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 मार्च 2017

कॉंग्रेसशी हातमिळवणी करुन जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपची कोंडी केली. त्यामुळे सर्वाधिक 23 सदस्य असलेल्या भाजपला हात चोळत बसावे लागणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे.

औरंगाबाद: कॉंग्रेसशी हातमिळवणी करुन जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपची कोंडी केली. त्यामुळे सर्वाधिक 23 सदस्य असलेल्या भाजपला हात चोळत बसावे लागणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे.कॉंग्रेसच्या सात सदस्यांसह मनसे आणि आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी केलेले प्रयत्न फसल्यामुळे भाजप नेते हताश झाले आहेत. 

शिवसेनेचा अध्यक्ष होईपर्यंत शिवसेना व कॉंग्रेसच्या सगळ्या सदस्यांना मुंबईत सहलीवर नेण्यात आले आहे. हे सदस्य स्वंतत्रपणे गेले असले तरी त्यांच्यावर पालकमंत्री रामदासभाई कदम यांचा वॉच असल्याचे समजते. कुठल्याही प्रकारच्या अमिषाला सदस्य बळी पडू नये याची विशेष काळजी दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे. आता शिवसेना- कॉंग्रेसचे सगळे सदस्य थेट 21 मार्च रोजी मतदानासाठीच जिल्हा परिषदेत दाखल होणार आहेत. 

जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष बसवण्याचे स्वप्न शिवसेनेच्या "बाणा'मुळे धुळीस मिळाल्यात जमा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कॉंग्रेसचे सात सदस्य फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आता समोर आली आहे. मनसे आणि आरपीआय डेमोक्रॅटिकचे दोन सदस्य व कॉंग्रेसचे सात असे नऊ जण भाजपच्या गळाला लागले होते. पण याची कुणकुण लागताच आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष नामदेव पवार व शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी वेगवान हालचाली करत या सदस्यांना रोखून धरले. विशेष म्हणेज भाजपने या 9 पैकीच एकाला थेट अध्यक्षपदाची ऑफर दिल्याची देखील चर्चा आहे. शिवसेनेचा गेम त्यांच्यावरच उलटवण्याचा भाजपचा हा प्रयत्न सर्तक असलेल्या कॉंग्रेस-शिवसेनेच्या नेत्यांनी हाणूण पाडला. 

सदस्यांना पालकमंत्र्यांचे सुरक्षा कवच 

कॉंग्रेस सदस्यांना फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे कळताच शिवसेना व कॉंग्रेसच्या सर्वच्या सर्व 34 सदस्यांना मुंबईला घेऊन येण्याचा निरोप पालकमंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या नेत्यांना धाडला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्फत कॉंग्रेसला देखील माहिती देण्यात आली. त्यांनतर शनिवारी स्वतंत्रपणे शिवसेना-भाजपचे सदस्य व नेते मुंबईला रवाना झाले. या सर्व सदस्यांच्या सुरक्षेची व निवासाची व्यवस्था रामदास कदम यांच्या आदेशाने मुंबईतील एका अलिशान हॉटेलात करण्यात आल्याचे समजते. महिला सदस्यांसोबत त्यांच्या पतीराजांना देखील सहल घडवण्यात आली असून कुणालाही परवानगी शिवाय हॉटेलच्या बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

भाजपने आशा सोडली 

प्रयत्नाची पराकाष्ठा करून देखील कॉंग्रेस-शिवसेनेचे सदस्य हाती लागत नसल्याने व सगळेजण सहलीवर गेल्यामुळे भाजपने आता अध्यक्षपदाची आशा सोडून दिल्याचे बोलले जाते. जालना जिल्हा परिषदेतील अध्यक्षपदाच्या बदल्यात शिवसेनेला औंरगाबादेत अध्यक्षपदाची संधी देण्याची तयारी भाजपने दाखवली होती. पण शिवसेनेकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. मग थेट कॉंग्रेसलाच सुरुंग लावण्याच प्रयत्न भाजपकडून झाला, त्यात त्यांना यशही आले होते. मात्र वेळीच सावध झालेल्या कॉंग्रेसने खबरदारी घेत सदस्यांना मुंबईत हलवले आणि भाजपचा डाव फसला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख