नगरमध्ये नाही जमले पण औरंगाबादेत महायुतीने  9-0 असा विजय मिळवला 

पुर्व, मध्य, पश्‍चिम या शहरातील तीनही मतदारसंघासह ग्रामीणमधील पैठण, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूरमध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले आहेत.
jaiswal-save-shirsat
jaiswal-save-shirsat

औरंगाबादः नगर जिल्ह्यात 12 - 0  असा विजय मिळविण्याचच्या युतीच्या नेत्यांच्या घोषणा हवेतच विरल्या . पण औरंगाबाद जिल्ह्यातील 9 - 0  असा विजय मिळवत शिवसेना-भाजप महायुतीने खणखणीत यश मिळवले आहे.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जिल्ह्यातून सुपडासाफ झाला आहे.
गेल्यावेळी स्वंतत्र लढल्याचा फटका युतीला बसला होता. यावेळी मात्र युतीच्या एकजुटीने  पुर्व, मध्य, पश्‍चिम या शहरातील तीनही मतदारसंघासह ग्रामीणमधील पैठण, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूरमध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेने सहा तर भाजपने तीन जागा लढवल्या होत्या. शहरातील मध्य, पश्‍चिम तर ग्रामीण मधील पैठण, वैजापूर, कन्नड आणि सिल्लोड मतदारसंघ शिवसेनेकडे तर पुर्व, फुलंब्री आणि गंगापूर हे मतदारसंघ भाजपकडे होते. पुर्वमध्ये अतुल सावे, फुलंब्री-हरिभाऊ बागडे, गंगापूर-प्रशांत बंब यांनी विरोधकांना धूळ चारत विजय मिळवला. तर शिवसेनेने पश्‍चिम-संजय शिरसाट, मध्य-प्रदीप जैस्वाल, कन्नड-उदयसिंह राजपूत, सिल्लोड- अब्दुल सत्तार, वैजापूर प्रा. रमेश बोरणारे यांनी विजय मिळवत विरोधकांची धूळधाण उडवली.

  पराभवाचा वचपा?

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले होते. या पराभवाचे शल्य जिल्ह्यातील मतदारांच्या मनात होते असे बोलले जाते. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला. शिवसेनेने सहाही मतदारसंघात विजय मिळवत लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढल्याची चर्चा या विजयानंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपने देखील आपल्याकडचे मतदारसंघ कायम राखत महायुतीच्या विजयाचा पाया जिल्ह्यात भक्कम केला.

स्थानिक पातळीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, डॉ. भागवत कराड यांच्यासह युतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारात झोकून दिले होते.

पवारांच्या प्रचंड सभांना गर्दी, पण ...

जिल्ह्यात कॉंग्रेसने फुलंब्री व सिल्लोड वगळता इतर कुठेही उमेदवार दिले नव्हते. शिवाय या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी देखील राज्य पातळीवरचा कुठलाच नेता जिल्ह्यात आला नव्हता. तर राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्य प्रचारासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले होते. त्यांच्या जिल्ह्यातील कन्नड, वैजापूरमध्ये सभा झाल्या. मतदारांच्या सभांना प्रचंड प्रतिसादही मिळाला. पण त्याचे रुपांतर मतांमध्ये मात्र होऊ शकले नाही.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रकाश आंबेडकर, तर एमआयएमच्या प्रचाराची धुरा असदुद्दीन ओवेसी, इम्तियाज जलील यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मुस्लिम बहुल भागात ओवेसींच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. पण वंचितसोबत घेतलेला काडीमोड एमआयएमला चांगलाच महागात पडला आणि त्यांना मध्यची जागा देखील राखता आली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com