शिवसेना-भाजपमधील वाद तात्पुरते - भगवान घडामोडे

महापौर म्हणूनमाझी जेव्हा निवड झाली, तेव्हा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था होती. तेपाहून जोपर्यंत शहर खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत नागरी सत्कारस्वीकारणार नाही अशी शपथ मी घेतली होती. मुख्मंत्र्यांनी माझे कौतुक करूनशपथ घेऊन थांबू नका तर निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करा अशा सूचना मलाकेल्या होत्या.
bapu-aurangabad
bapu-aurangabad

औरंगाबाद    :  महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये शंभर कोटी रुपयांच्या निधीचे श्रेय कुणाचे यावरून निर्माण झालेला वाद, चीनच्या अभ्यास दौऱ्याला शिवसेना-एमआयएम कडून झालेला विरोध, रस्त्यांच्या यादीवरून भाजपवर होणारे आरोप या  पार्श्‍वभूमीवर महापौर भगवान घडामोडे यांनी
सरकारनामाशी बातचीत केली. शिवसेना-भाजपमधील वाद हे तात्पुरते असल्याचे सांगत भविष्यात देखील आमची मैत्री कायम राहील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

प्रश्‍न :  तुमचा चीन दौरा वादग्रस्त ठरतोय?

उत्तर- मुळात चीन दौऱ्यावर आम्ही कशासाठी जातोय हे लक्षात घेतल पाहिजे.महापौर, आयुक्त, नगरसेवकांचे विदेश दौरे हे पर्यटनासाठी नाही तर अभ्यासासाठी आयोजित केले जातात. चीनला देखील त्याच उद्देशाने आम्ही जात
आहोत. चीनला फक्त पाचजणांचे शिष्टमंडळ आमंत्रित करण्यात आले आहे. महापौर या नात्याने मी स्वःत आयुक्त, भाजपचे गटनेते आणि शिवसेनेच्या नगरसेवकाची निवड या दौऱ्यासाठी करण्यात आली होती. पण शिवसेनेला डावलले असा त्यांचा गैरसमज झाला. तर एमआयएमच्या विरोधी पक्षनेत्यांनी मला ही घेऊन चला अशी मागणी केली होती. पण मर्यादित संख्येमुळे त्यांना नेणे शक्‍य नव्हते.त्यामुळे एमआयएमचा विरोध मी समजू शकतो. शिवसेनेने देखील बहिष्कार मागे घेतला आहे. राजेंद्र जंजाळ हे आमच्या सोबत चीनला येतायेत.

प्रश्‍नः शंभर कोटींच्या निधीचे श्रेय एकट्या भाजपचे कसे?

उत्तर-औरंगाबाद महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे. मनाचा मोठेपणा दाखवत सर्वच राजकीय पक्षांनी त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला हवे. महापौर म्हणून
माझी जेव्हा निवड झाली, तेव्हा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था होती. ते पाहून जोपर्यंत शहर खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत नागरी सत्कार स्वीकारणार नाही अशी शपथ मी घेतली होती. मुख्मंत्र्यांनी माझे कौतुक करून
शपथ घेऊन थांबू नका तर निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करा अशा सूचना मला केल्या होत्या. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे यांच्यासह आमच्या अन्य पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सातत्याने निधीसाठी
मुख्यमंत्र्याकेड पाठपुरावा केला. त्या प्रयत्नांना यश मिळाले आणि हा निधी पदरात पडला. आता त्यातून शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचे सोडून श्रेय कुणाचे यावरून वाद निर्माण करणे योग्य नाही.

प्रश्‍न  : निधीची घोषणा करतांना शिवसेनेला डावलण्यात आले?

उत्तर- रस्त्यासाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करतांना यातून शहरातील कोणते रस्ते करायचे, कोणत्या वार्डांना प्राधान्य द्यायचे या संदर्भात शिवसेनेसह सर्वच पक्षांशी चर्चा करण्यात आली होती. शिवाय शंभर कोटी
रुपयांचा निधी राज्यातील भाजप सरकारने मंजुर केला आहे. मग आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी निधी मंजुर झाल्याची घोषणा केली तर काय बिघडले? यात कुणाला डावलण्याचा प्रश्‍नच नव्हता.

प्रश्‍न   :  रस्त्यांच्या यादी दडवून का ठेवली?

उत्तर-  रस्त्यांची यादी दडवून ठेवली, फक्त भाजप नगरसेवकांच्या वार्डातीलच कामे होणार या सगळ्या अफवा आहेत. आतापर्यंत निधीच हातात नव्हता त्यामुळे
या आरोपांना काही अर्थ नाही. महापौर म्हणून मला असा विचार देखील करता येणार नाही. मिळालेल्या निधीतून शहरातील मुख्य रस्ते, डीपी प्लानमधील रस्ते, मकबऱ्याकडे जाणारा मॉडेल रस्ता याशिवाय सर्व पक्षातील
नगरसेवकांच्या वार्डातील अधिकाधिक रस्त्यांचा समावेश, तेही सर्वांशीचर्चा करून केला जाणार आहे.

प्रश्‍न  :  शिवसेना-भाजपचे वाद टोकाला गेले आहेत?

उत्तर- अजिबात नाही, शिवसेना-भाजपमध्ये निर्माण झालेले वाद हे तात्पुरत्या स्वरुपाचे आहेत. त्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न महापौर या नात्याने मी करत असतो. सध्या निर्माण झालेल्या वादानंतर देखील मी शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधून वाद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घेतोय. शिवसेनेने चीन दौऱ्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेत नोंदवलेला सहभाग हे त्याचे उदाहरण आहे.

प्रश्‍नः युतीतील तणावाचा परिणाम आगामी महापौर निवडणूकीवर होईल का?

उत्तर-महापालिकेत काम करत असतांना काही प्रश्‍नांवर शिवसेना-भाजपमध्ये मतभेद होतात. पण ते कुठवर ताणायचे हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांना कळते. संबंध तुटणार नाही याची काळजी आम्ही निश्‍चित घेत असतो. त्यामुळे युतीतील तणावाचा परिणाम कुठल्याही परिस्थीतीत आगामी महापौरपदाच्या निवडणुकीवर होणार नाही. युतीमध्ये झालेल्या करारनाम्याचे पालन दोन्ही बाजूने केले
जाईल याबाबत कुणाच्याही मनात शंका असता कामा नये. भाजप महापौरपदासाठी उमेदवार देणार या सगळ्या अफवा आहेत, त्यात तथ्य नाही.

प्रश्‍न ः भूमिगत गटार योजना व पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न कसा सोडवणार?

उत्तर- भूमिगत गटार योजने संदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतर त्याची महापालिकास्तरावर चौकशी करण्यात येत आहे. समांतर जलवाहिनीचा चेंडू कोर्टात असल्याने त्याचा निकाल लागेपर्यंत आपल्याला वाट पहावी लागेल.
जायकवाडी धरणापासून नक्षत्रवाडीपर्यंत आपण पाणी आणू शकलो तरी शहराच्यापाण्याचा बराचसा प्रश्‍न मिटेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com