शिवसेनेला तोडू नका, संघ नेत्यांचा मोदी -शाह यांना सल्ला ? 

शिवसेनेला तोडू नका, संघ नेत्यांचा मोदी -शाह यांना सल्ला ? 

मुंबई : सत्तेतून बाहेर पडण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली असली तरी भाजप सत्तेत असताना त्यांना सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा. हिंदुत्त्वाच्या मुद्यावर एनडीएतील हा जुना सहकारी पक्ष असल्याने शिवसेनेला स्वतःहून दुखावू नका, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना दिल्याचे समजते. 

शिवसेना ही केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मोदी यांच्यापासून भाजपवर थेट टीका करतात. दसरा मेळाव्यात शिवसेना ही भाजपविरोधात भूमिका जाहीर करण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेने मुंबईत शनिवारी महागाई विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करताना भाजपच्या नेत्यांना झोंबणाऱ्या घोषणा दिल्या. एवढेच नाही तर 'एवढी माणसे कशाला मोदीच्या मयताला ' अशी घोषणा देऊन पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न झाला. परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेबाबत सबुरीची भूमिका घेतलेली दिसते. त्यामुळे मोदी यांच्या विरोधात घोषणा देणाऱ्यांवर पोलीस कारवाईचा बडगा उगारला गेला नाही. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजपची सत्ता आली. त्यानंतर अनेक राज्यात स्वबळावर भाजप सत्ता काबीज करू शकला आहे. मात्र, अच्छे दिनचा निवडणुकीपूर्वी प्रचार करून सर्वसामान्य नागरिकांना आशा दाखवण्यात आली होती. तीन वर्षांनंतर नोटबंदी आणि जीएसटी सारखे निर्णय घेतल्याने त्याचा थेट संबंध हा नागरिकांच्या व्यवहाराशी येत असल्याने सरकारवर सर्वच खुश आहेत अशी परिस्थिती नाही, हे गावोगावी प्रचार करणाऱ्या संघाला माहीत आहे . शिवसेना हा महाराष्ट्रापुरता पक्ष असला तरी देशातील हिदु विचारसरणीच्या जनतेमध्ये शिवसेनेबाबत सहानुभूती आहे. 

तसेच राज्यात भाजपची सत्ता टिकावी यासाठी राष्ट्रवाडी किंवा अन्य पक्षांचा पाठिंबा घेण्याऐवजी विरोधी पक्षनेते पद स्वीकारणाऱ्या शिवसेनेला सत्तेत सामावून घ्यावे यासाठी संघाचा आग्रह होता. त्यानंतर शिवसेना सत्तेत सहभागीही झाली. भाजपच्या राजकारणात संघ थेट हस्तक्षेप करत नसला तर सद्यस्थितीवर नजर ठेवून लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या संघाकडून वेळोवेळी वडीलकीचा सल्ला देण्याची भूमिका घेतली जाते. शिवसेना ही सत्तेतून बाहेर पडली तर मित्र पक्षांना सांभाळून घेतले जात नाही असा भाजपबाबत चुकीचा संदेश जाईल अशी भीती ही व्यक्त करण्यात येत आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी खास एका बैठकीसाठी दिल्लीतुन मुंबईत येऊन संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांची मंगळवारी भेट घेतल्यामुळे संघ नेत्याचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.त्याच बरोबर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वांद्रे येथे सचिन तेंडुलकर बरोबर काल स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याकडून आदित्यचे कौतुक करणे हे सेनेशी आजही आपण जुळवून घेत असल्याचे मोदी यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com