शिवसेना - भाजपमध्ये नव्याने मैत्रीचे वारे !

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांना पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी पाठिंबा देताच भाजप शिवसेनेतील मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे.वैचारिक आधारावर एकेकाळी प्रत्यक्षात आलेली ही युती 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झाले गेले विसरून कायम रहावी अशी इच्छा काही शिवसेनानेत्यांनी भाजपनेत्यांकडे व्यक्‍त केली आहे.
शिवसेना - भाजपमध्ये नव्याने मैत्रीचे वारे !
शिवसेना - भाजपमध्ये नव्याने मैत्रीचे वारे !

मुंबई:  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद यांना पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांनी पाठिंबा देताच भाजप शिवसेनेतील मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे.वैचारिक आधारावर एकेकाळी प्रत्यक्षात आलेली ही युती 2019 च्या लोकसभा निवडणुकीत झाले गेले विसरून कायम रहावी अशी इच्छा काही शिवसेनानेत्यांनी भाजपनेत्यांकडे व्यक्‍त केली आहे.

भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचाही शिवसेनेचा मैत्रीचा हात हातात राहावा असा सूर आहे . यानिमित्ताने दोन्ही पक्षामध्ये निर्माण झालेला तणाव आता निवळावा  आणि गैरसमज दूर होऊन एकदिलाने राज्यकारभार चालावा अशी भावना भाजपमधील काही वरिष्ठ मंत्री व्यक्त करीत आहेत . दोन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये देखील राज्यात स्थैर्य राहावे अशीच भावना आहे , असे समजते . 

मोदी- शहा यांच्या नेतृत्वातल्या भाजपने लोकसभेच्या एकेका जागेचे पदधतशीर नियोजन आतापासूनच  सुरू केले आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या खासदारांच्या कार्यक्षेत्रात काम सुरु करण्यापूर्वी  दोन्ही पक्षात एकवाक्यता निर्माण व्हावी असे शिवसेनेतील काही नेत्यांना वाटते . राज्यात शिवसेनेचे  22 खासदार कायम ठेवायची असेल तर भाजपशी हातमिळवणी करणे हाच उत्तम पर्याय असल्याचे या नेत्यांचे मत असल्याचे समजते.

मातोश्रीशी सख्य असलेल्या भाजपतील काही नेत्यांनी उदधवजींना या नेता भावनेची माहिती देणे सुरू केले आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख या नात्याने खासदार संख्या राखण्यासाठी ते या प्रस्तावाबाबत फारसे प्रतिकूल नसल्याचेही सांगण्यात येते आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भेटीदरम्यान शिवसेनेने घटकपक्षाच्या चौकटीत वागायचे ठरवले तर त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल असे संकेत दिल असे समजते.या सकारात्मक वाक्‍याची नकारात्मक बाजू शिवसेनेला माहित असल्याने या पुढे शिवसेना रूळ सोडणार नाही अशी भाजपला आशा आहे.

मात्र या निरोपाचा योग्य तो अर्थ काढून आपण आपल्या आगामी वाटचालीचे धोरण आखायला हवे असे सेनेतील काही महत्वाच्या नेत्यांना वाटते.सामना या मुखपत्राने सतत टिकेचा सूर लावला तरी मंत्रिमंडळातील सेनेचे सर्व सदस्य सत्ता सोडण्यास मनापासून तयार होतील का आणि  आमदारांनाही सत्तेचा लाभ मतदारसंघातील योजना आणि विकास कामांसाठी  आवश्यक वाटतो .  हिंदुत्वाचा समान मुददा असलेले अन गेली कित्येक वर्षे खांदयाला खांदा भिडवून काम करणारे दोन पक्ष सतत परस्परविरोधी भूमिका घेवून वागू  शकत नाही असे सेनेतील मवाळ गटाचे मत आहे.

मराठी अस्मिता हा एकमेव मुददा शिवसेनेकडचे हुकुमाचे पान आहे.पण मुंबईसारख्या बालेकिल्ल्यातही मराठी टक्‍का भाजपकडे काही प्रमाणात झुकू शकतो हे महापालिका निकालांनी दाखवल्यामुळे या पक्षाशी गरजेनुसार मैत्री ठेवणे सेनेतील या वर्गाला आवश्‍यक वाटते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आजही अबाधित असल्याने समवेत रहाणे हा उत्तम मार्ग मानला जातो आहे.

विधानसभांचे मतदारसंघ छोटे असतात,शिवाय शेतकरी असंतोष ,स्थानीक जातीय समीकरणे हे विषय या भागात सेनेला मदत करू शकतात , मात्र लोकसभा मतदारसंघांची व्याप्ती लक्षात घेता ठाणे, नाशिक, परभणी असे काही मतदारसंघ लक्षात घेता भाजपला तोड देणे कठिण ठरेल असेही या गटाला वाटते.भाजपचे राज्यातील मंत्री आज पक्षप्रमुख या नात्याने उदधवजींना कायम मान देत आले आहेत, ही भावना पुढे नेत उरलेल्या दिड वर्षात एकोप्याने वागावे अन हवे ते खुबीने मिळवून घ्यावे असा या गटाचा सूर आहे.

भाजपतील सुत्रांनीही शिवसेनेला समवेत ठेवणे ही गरज असल्याचे आम्हाला कळते असे स्पष्ट केले.शिवसेनेचे हे महत्व लक्षात घेतच मुंबईचे महापौरपद त्यांची ताकद काकणभर जास्त असल्याने आम्ही त्यांनाच बहाल केले असेही भाजपमध्ये बोलले जाते.अमित शहा यांच्या दौऱ्याने लोकसभेच्यातयारीला प्रारंभ केला असल्याने युतीतील संबंध पुन्हा नव्या वळणावर पोहोचल्याचे मानले जाते आहे.

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अधिकृतपणे यासंबंधात काहीही बोलणे टाळले असले तरी विरोधाला विरोध करणार नाही हे उदधव ठाकरेंचे विधान आणि गेल्या आठवडयात भाजपनेत्यांनी मातोश्रीवर किमान पाचवेळा जाणे हे बदललेल्या संबंधांचे दयोतक मानले जाते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com