शिवसेना-भाजप युतीची घोषणा एक -दोन दिवसात : उद्धव ठाकरे 

..
uddhav_thakre
uddhav_thakre

मुंबई : "आता भाजप-शिवसेना यांची युती होणार आहे. युतीचा फॉर्म्युला  ठरलेला आहे. युतीबाबत एक-दोन दिवसांत घोषणा होईल ",असे शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिवसेना-भाजप यांच्यात किती जागांचे ठरले आहे? मुख्यमंत्री पदाचे काय ? असे अनेक प्रश्‍न पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, " या सर्व प्रश्‍नांचा खुलासा युतीची घोषणा झाल्यावर होईल. यात कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. युतीचा फॉर्मुला लोकसभेच्या वेळेला ठरला आहे. अमित शहा, मुख्यमंत्री आणि मी असे तिघांचे मिळून ठरले आहे. याबाबत एक-दोन दिवसात घोषणा होईल.''

नाणार आणि आरे शेडवरून सध्या सुरू असलेल्या वादाबाबत श्री. ठाकरे म्हणाले, " विकास कामाला आमचा विरोध नाही. फक्त मेट्रोची कारशेड आरेच्या जागेतच करण्याचा अट्टाहास आम्हाला मान्य नाही. नाणारच्या प्रकल्पाला स्थानिक लोकांचा तीव्र विरोध आहे. त्यांना प्रकल्प नको आहे. नाणारबाबत एकदा निर्णय झालेला असल्यामुळे पुन्हा निर्णय बदलला तर सरकारवरील विश्‍वास उडेल.''

नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर प्रश्‍नावर नाशिक येथे बोलताना उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केली होती. याबाबत विचारणा झाली असता श्री. ठाकरे म्हणाले, " न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्‍वास आहे पण निकालाला विलंब होतो आहे असे वाटल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी मी यावर भूमिका मांडली होती. न्यायालयात प्रश्‍न सुटत नसेल तर सरकारने निर्णय घ्यावा असे मी म्हणालो होतो. मी अयोध्येला जाऊन आलो होतो, विधानसभेपूर्वी मी अयोध्येला जाईन पण अजून नक्की ठरवले नाही. आता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना न्यायालयातून लवकर निकाल लागेल असे वाटत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. न्यायालयाचा निर्णय निःपक्षपाती असतो. त्यामुळे न्यायालयातून येणाऱ्या निर्णयाची आम्ही वाट पाहू.''

नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सरकार पाच वर्षे अस्थिर होते असे विधान केलेले आहे त्यावर प्रतिक्रिया देताना श्री. ठाकरे म्हणाले, " राज्य सरकारला पूर्ण बहुमत नव्हते पण सरकारला शिवसेनेने कधीही दगा दिला नाही. शिवसेनेने सरकारला सातत्याने पाठिंबा दिला. प्रारंभी मंत्र्यांनी राजीनाम्याची भाषा केली असली तरी सरकारच्या स्थैर्यावर त्याचा परिणाम झाला नाही."

या पत्रकार परिषदेत विदर्भातील शेतकरी नेते आणि कृषी प्रश्‍नांचे अभ्यासक किशोर तिवारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. श्री. ठाकरे यांनी तिवारी यांना शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. किशोर तिवारी हे शिवसेनेचे अधिकृत कृषी सल्लागार असतील आणि ते शिवसेनेच्या शेतकरी विभागाचे काम पाहतील, असे श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com