काॅंग्रेसचे आमदार थोपटेंच्या नावासाठी शिवसेनेच्या बारणेंचा आग्रह - shivsena barane insist for congress thopate name | Politics Marathi News - Sarkarnama

काॅंग्रेसचे आमदार थोपटेंच्या नावासाठी शिवसेनेच्या बारणेंचा आग्रह

उत्तम कुटे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

राज्यातील शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्यातील महाआघाडीचे परिणाम स्थानिक पातळीवरही

पिंपरी : राज्यात सत्तेत एकत्र आलेल्या कॉंग्रेस व शिवसेना या टोकाच्या विचारधारेच्या पक्षांचा याराना आता स्थानिक पातळीपर्यंत झिरपू लागला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा एक प्रभाग हा भोर-वेल्हा विधानसभा,तर  लोकसभेच्या बारामती  मतदारसंघात मोडतो. त्यामुळे भोर-वेल्ह्याचे कॉंंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव महापालिकेच्या निमंत्रणपत्रिकेवर टाकण्याची मागणी येथील शिवसेना नगरसेवक निलेश बारणे यांनी केली आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे भोरमध्ये येणाऱ्या प्रभागाचे नगरसेवक नसूनही शिवसेनेच्या बारणे यांनी कॉंग्रेसच्या आमदारांचे नाव टाकण्याची मागणी केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे.

शहराचा काही भाग (ताथवडे प्रभाग) हा भोर-वेल्ह्यात मोडत असल्याने राजशिष्टाचारानुसार महापालिकेच्या प्रत्येक निमंत्रणपत्रिकेत या मतदारसंघाचे आमदार थोपटे यांचे नाव येणे आवश्यक आहे, असे नगरसेवक बारणे यांचे म्हणणे आहे.त्यामुळे तशी लेखी मागणी त्यांनी मंगळवारी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली.

बारणे यांचा प्रभाग भोरमध्ये येत नाही. दुसरेच चार नगरसेवक त्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी पालिकेत राजशिष्टाचाराचे पालन केले जात नसल्याचा आरोप बारणेंनी केला. पिंपरी महापालिकेच्या कार्यक्रमपत्रिकेत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव टाकले जाते. परंतु  थोपटे यांच्या नावाचा समावेश केला जात नाही. याला बारणे यांचा आक्षेप आहे. पालिका प्रशासन आपल्या मागणीवर काय कार्यवाही करते यावर लक्ष असून ती केली नाही,तर काय करायचे हे त्यानंतर ठरवले जाईल,असे त्यांनी `सरकारनामा`ला सांगितले. पुणे पालिका राजशिष्टाचाराचे पालन करते.मग पिंपरी पालिकेने ते का करू नये, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख