Shivsena on backfoot in Kankavali | Sarkarnama

कणकवलीत शिवसेना बॅक फुटवर

मिलिंद तांबे  
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

..

मुंबई :  कणकवली मतदारसंघात नितेश राणे यांच्या विरोधात उमेदवार देऊन रणशिंग फुंकलेली शिवसेना बॅक फूट वर आल्याचं पाहायला मिळालं.

भाजपच्या नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना ए/बी फॉर्म देऊन उमेदवारी दिली.मात्र शिवसेनेने जारी केलेल्या आपल्या 124 उमेदवारांच्या अधिकृत यादीत मात्र सतीश सावंत यांचं नाव नसल्याने कणकवलीत शिवसेना संभ्रमित असल्याचे दिसते.

खासदार नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास शिवसेनेने टोकाचा विरोध केला. शिवसेनेच्या या विराधामुळेच राणेंचा भाजप प्रवेश रखडला.

मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस अगोदर शिवसेनेचा विरोध डावलून नितेश राणे यांना घाईघाईत भाजपमध्ये प्रवेश देत त्यांना कणकवली मधून उमेदवारी ही दिली. 

मात्र नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी देत त्यांना ए/बी फॉर्म ही दिला आणि भाजप सोबत दोन हात करण्याचा निर्धार केला.

यामुळे सतीश सावंत हे भाजच्या नितेश राणे यांच्याविरोधात धनुष्यबाण या निशाणीवर लढणार हे स्पष्ट झालं होतं.काहीही झालं तरी शिवसेना नितेश राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारच अशी घोषणा शिवसेनेने वारंवार केली.

मंगळवारी संपन्न झालेल्या दसरा मेळाव्यात देखील शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पहिल्या विजयाची सुरुवात ही कणकवली मधून होईल असं जाहीर केलं होतं.

मात्र यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने जाहीर केलेल्या आपल्या अधिकृत उमेदवार रांच्या यादीमध्ये कणकवली मधील सतीश सावंत यांच्या नावाचा उल्लेख नाही.यामुळे शिवसेनेला नितेश राणे यांच्या विरोधातील आपली भूमिका गुंडाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख