shivsena in aurangabad | Sarkarnama

औरंगाबादेत शिवसेनेतून आऊटगोईंग सुरु

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 एप्रिल 2017

औरंगाबाद ः जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसशी हातमिळवणी करुन सत्ता मिळवली. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असून देखील भाजपवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. हा अपमान सहन न झाल्याने खवळलेल्या भाजपने शिवसेनेला धडा शिकवण्याचा निर्धार केल्याचे दिसते. आठवडाभरात शिवसेनेतील दोन पदाधिकारी भाजपमध्ये खेचत सेनेच्या बालेकिल्ल्याला हादरे देण्यास भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने सुरुवात केली आहे. 

औरंगाबाद ः जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेने कॉंग्रेसशी हातमिळवणी करुन सत्ता मिळवली. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष असून देखील भाजपवर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. हा अपमान सहन न झाल्याने खवळलेल्या भाजपने शिवसेनेला धडा शिकवण्याचा निर्धार केल्याचे दिसते. आठवडाभरात शिवसेनेतील दोन पदाधिकारी भाजपमध्ये खेचत सेनेच्या बालेकिल्ल्याला हादरे देण्यास भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने सुरुवात केली आहे. 

जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्षपद शिवसेना आणि कॉंग्रेसने पटकावल्यानंतर किमान विषय समिती सभापती निवडणुकीत तरी शिवसेनेने भाजपला मदत करावी अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली होती. वैजापूरचे माजी आमदार आर.एम. वाणी यांच्या मध्यस्थीने भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी शिवसेनेला गळ घालत किमान एक सभापतीपद भाजपला द्यावे अशी मागणी केली होती. शिवसेनेने देखील विचार करतो असे सांगत भाजपला आशेवर ठेवले. पण ऐनवेळी कॉंग्रेस सोबत ठरलेला फार्म्युला वापरत प्रत्येकी दोन सभापती पद मिळवली. तर तिकडे महापालिकेतील प्रभाग समिती सभापती निवडणुकीत देखील शिवसेनेने मदत न केल्यामुळे भाजपला फटका बसला. शिवसेनेने आपला विश्‍वासघात केल्याचा आरोप करत भविष्यात पुन्हा कधीच शिवसेनेशी युती करणार नसल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सोमवारी स्पष्ट केले. दुसरीकडे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी मात्र गुप्तपणे आगामी विधानसभा व महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना फोडण्याची मोहिम हाती घेतली आहे. 
मोठा मासा गळाला लागेना 
शिवसेना सोडून भाजपमध्ये जातांना शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी त्यांच्या सोबत शिवसेनेचे हुशारसिंग चव्हाण, जगदीश सिध्द व सुरेंद्र कुलकर्णी या तीन नगरसेवकांना सोबत नेले होते. तनवाणी यांच्या मध्य विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीमुळे शिवसेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का होता, त्यानंतर सेनेचे तीन नगरसेवक पळवत तनवाणी यांनी शिवसेनेला धोक्‍याचा इशारा दिला होता. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे विभागप्रमुख बाळू गायकवाड यांचा प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला होता. त्यानंतर आज मंगळवारी शिवसेना अपंग आघाडीचे जिल्हा संघटक अरुण तुपे यांना पक्षात प्रवेश दिला. आठवडाभरात दोन शिवसेनेचे पदाधिकारी भाजपमध्ये गेल्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेतीला एखादा मोठा मासा गळाला लावून हादरा देण्याची तयारी भाजपकडून सुरु असल्याचे बोलले जाते. 
पश्‍चिम मतदारसंघावर डोळा

 तनवाणी यांनी भाजपमध्ये आणलेले दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना आमदार संजय सिरसाट यांच्या पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील आहेत. बाळू गायकवाड हे सिरसाट यांचे अत्यंत विश्‍वासू आणि माजी स्वीय सहायक होते. गेल्या निवडणुकीत सिरसाट यांच्या प्रचाराची संपुर्ण यंत्रणा गायकवाड यांनीच सांभाळली होती. आज भाजमध्ये आलेले अपंग आघाडीचे अरुण तुपे यांचा देखील या मतदारसंघात चांगला संपर्क आहे. त्यामुळे पश्‍चिम विधानसभा मतदारसंघावर डोळा ठेवून भाजपने संजय सिरसाट यांच्यापुढे येत्या निवडणुकीत मोठे आव्हान उभे करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल समजले जाते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख