Shivsena to Appoint Boothwise Branch heads to make Aditya Thackeray CM | Sarkarnama

आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदासाठी बुथनिहाय शाखाप्रमुख

तात्या लांडगे
बुधवार, 15 जानेवारी 2020

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे तीन जिल्हाप्रमुख असून त्यामध्ये पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर व धनंजय डिकोळे यांचा समावेश आहे. तत्पूर्वी, शिवसेनेने पक्ष वाढीसाठी सहसंपर्कप्रमुख व जिल्हा समन्वयक ही पदे निर्माण केली. आता शाखा प्रमुखांच्या माध्यमातून गावोगावी शाखा उघडण्याचे नियोजन करण्यात आले आहे

सोलापूर : भाजपचे कमळ खाली ठेवून शिवसेनेने हात (कॉंग्रेस) व घड्याळाला (राष्ट्रवादी कॉंग्रेस) सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. परंतु, आगामी निवडणुकांमध्ये स्वत:चा पक्ष मजबूत करुन स्वबळावर निवडणूक जिंकण्याची तयारी प्रत्येक पक्षांकडून सुरु आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी शिवसेनेने आता बुथनिहाय शाखाप्रमुख असा कार्यक्रम हाती घेतला असून प्रत्येक जिल्हाप्रमुखासाठी स्वतंत्र संपर्कप्रमुख देण्याचेही नियोजन केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे तीन जिल्हाप्रमुख असून त्यामध्ये पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर व धनंजय डिकोळे यांचा समावेश आहे. तत्पूर्वी, शिवसेनेने पक्ष वाढीसाठी सहसंपर्कप्रमुख व जिल्हा समन्वयक ही पदे निर्माण केली. आता शाखा प्रमुखांच्या माध्यमातून गावोगावी शाखा उघडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी हे मित्रपक्ष असून त्यांना सोबत घेत शिवसेनेने राजकीय समिकरण बदलत 'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षात बसविले. परंतु, हेच समिकरण आगामी निवडणुकीत काय राहील याबद्दल कोणालाच खात्री वाटत नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी आतापासूनच पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत यांना जुन्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर आता त्यांच्या जागी नव्या संपर्कप्रमुखाचा शोध सुरु झाला आहे. तर सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी तानाजी सावंत यांच्या समर्थनार्थ बैठक घेऊन त्यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणी केली. या पार्श्‍वभूमीवर त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व सहसंपर्कप्रमुख कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

► प्रत्येक जिल्हाप्रमुखांसाठी आता असणार स्वतंत्र संपर्कप्रमुख
► जुन्या- नव्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे संघटन मजबूत करण्यावर राहणार भर
► स्वबळावर सत्ता मिळवून आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा पदाधिकाऱ्यांचा मानस
► सोलापूर जिल्ह्याला नव्या संपर्कप्रमुख व सहसंपर्कप्रमुखांची प्रतीक्षा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आगामी काळात मुख्यमंत्री व्हावेत हे सर्वच शिवसैनिकांचे स्वप्न आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करुन जुन्या- नव्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची घडी बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. बुथनिहाय शाखाप्रमुख व प्रत्येक जिल्हाप्रमुखांसाठी स्वतंत्र संपर्कप्रमुख असा कार्यक्रम शिवसेना हाती घेणार आहे. आगामी काळात शिवसेनेचे पक्ष संघटन आणखी मजबूत होईल असा विश्‍वास आहे - पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना, सोलापूर

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख