राममंदिराचा मुद्दा हायजॅक करताच विहिंप, संघाकडून शिवसेनेची कोंडी ?

 राममंदिराचा मुद्दा हायजॅक करताच विहिंप, संघाकडून शिवसेनेची कोंडी ?

औरंगाबाद : चार राज्यातील विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा हाती घेऊन शिवसेनेने भाजपला अडचणीत आणण्याची चालाख खेळी केली. त्यासाठी येत्या 25 नोव्हेंबरला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट आयोध्येत जाऊनच मोदी सरकारला " मंदिर कब बनयायेंगे' असा सवाल करणार आहे. राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करत भाजपची गोची करणाऱ्या शिवसेनेवर आता त्यांचाच डाव उलटवण्याचा प्रयत्न विश्‍व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चालवला आहे. शिवसेना खासदारांची भेट घेऊन राम मंदिराचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी तुम्ही संसदेत आवाज उठवा असे आवाहन विहिंप व संघाकडून केले जात आहे. 

औरंगाबादचे खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची विहिंप व संघाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी त्यांच्या मछली खडक येथील संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काही धर्माचार्य देखील उपस्थित होते. पाच ऑक्‍टोबर रोजी दिल्लीत झालेल्या संत-धर्माचार्यांच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पारित झालेल्या ठरावाची प्रत देखील चंद्रकांत खैरे यांना देण्यात आली. राम मंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या प्राधान्यक्रमात नसल्याने न्यायालयातून हा प्रश्‍न सुटण्याची शक्‍यता नाही. तेव्हा राम मंदिरासाठी संसदेत कायदा करून हा विषय मार्गी लावण्यासाठी आपण पाठपुरावा करावा अशी विनंती यावेळी करण्यात आली. विहिंप आणि संघाकडून देशभरात हे अभियान राबवण्यात येणार असून सर्वपक्षीय खासदारांची भेट घेण्यात येणार आहे. 

या अभियानाअंतर्गतच औरंगाबादेत संघ आणि विहिंपच्या अनिल भालेराव, हरविंदरसिंग बिन्द्रा, पुरुषोत्तम हेडा, अंबरीश महाराज देगलुरकर, राजेश जैन, अविनाश जहागीरदार, राजवी जहागीरदार, काशीनाथ डापके, शैलेश पत्की, अशोक शहा, पी.यु.कुलकर्णी यांनी खासदार खैरे यांची भेट घेतली. राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला तेव्हा विश्‍व हिंदू परिषदेने शिवसेनेवर कडाडून हल्ला चढवला होता. शिवसेनेने आधी बाळासाहेबांचे स्मारक उभारावे मग राम मंदिराचा विषय हाताळावा अशा शब्दांत टिका केली होती. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने हाती घेतल्याचे रूचले नव्हते. 

परंतु आता याच प्रश्‍नावरून शिवसेनेच्या खासदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न विहिंप व संघ करत नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान खासदार खैरे यांनी राम मंदिरासाठी आपण संसदेत सकारात्मक भूमिका घेऊ असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिल्याचे कळते. 

राम मंदिरासाठी औरंगाबादेत सभा 
विश्‍व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने येत्या 2 डिसेंबरला औरंगाबादेत राम मंदिराच्या प्रश्‍नावर जाहीर सभा घेण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात होणाऱ्या या सभेला विश्‍व हिंदू परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष हूकूमचंद सावला मार्गदर्शन करणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com