आमच्या हातात एके - 47 द्या, शिवसैनिकही आत्मघातकी पथकात जायला तयार : शिवसेनेची भूमिका

आमच्या हातात एके - 47 द्या, शिवसैनिकही आत्मघातकी पथकात जायला तयार : शिवसेनेची भूमिका

औरंगाबाद : देशात नरेंद्र मोदी सारखा देशभक्त पंतप्रधान असतांना आमच्या जवानांचे एक थेंबही रक्त सांडणार नाही, देशाच्या सीमा सुरक्षित राहतील अशी अपेक्षा होती. पण कॉंग्रेस-युपीए सरकारच्या काळापेक्षाही अधिक दहशतवादी हल्ले आणि जवानांचे बळी या सरकारच्या काळात जात आहेत. सर्जिकल स्ट्राईकचा प्रचार करत आपली पाठ थोपटवून घेणाऱ्या सरकारने पाकिस्तानच्या गोळीला गोळीने उत्तर दिले पाहिजे असे आवाहन करतांनाच आमच्या हातात एके-47 द्या, शिवसैनिकही आत्मघातकी पथकात जाऊन सीमेवर शत्रूशी लढायला तयार आहे असा इशारा शिवसेनेने दिला. 

काश्‍मीरमधील पुलवामा येथे जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर जैश-ए-मोहंमदच्या आत्मघातकी दहशतवाद्याने गुरुवारी हल्ला केला. या भ्याड हल्याचा निषेध करण्यासाठी औरंगाबाद शिवसेनेच्या वतीने क्रांतीचौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. पाकिस्तानच्या नकाशावार प्रतिकात्मक गोळ्या चालवत शिवसैनिकांनी पाकिस्तानच्या भ्याड हल्याचा निषेध केला. 


यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हणाले, आमच्या हातात खऱ्या बंदुका दिल्या, तर देशाच्या रक्षणासाठी शिवसैनिक देशाच्या सीमेवर जाऊ शकतो. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसैनिकांच्या हातात एके-74 द्या, मग बघा अशी भूमिका घेतली होती. जैशच्या अतिरेक्‍याने जो आमच्या जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला, तसा देशाच्या रक्षणासाठी शिवसैनिक देखील आत्मघातकी पथकात जायला तयार आहेत. गेल्या चार वर्षात कश्‍मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. जशास तसे उत्तर देण्याची भाषा करणाऱ्या केंद्रातील सरकारने उलट पाकिस्तानला विशेष राष्ट्राचा दर्जा दिला. दुसरीकडे सर्जिकल स्ट्राईक केल्याबद्दल हे सरकार स्वःताचे कौतुक करून घेत आहेत, मात्र दुसरीकडे रोज आमचे जवान शहीद होत आहेत. त्यामुळे आता थेट गोळीला गोळीने उत्तर देण्याची वेळ आली असल्याची आठवण शिवसेनेने यावेळी करून दिली. 

 झेंडा जाळला, नकाशावर गोळ्या झाडल्या.. 
दहशतवादी हल्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेने निदर्शस्थली पाकिस्तानचा नकाशा आणि झेंडा देखील आणला होता. प्रतिकात्मक बंदुकीने पाकिस्तानच्या नकाशावर गोळ्या झाडत शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत दहशतवादी हल्याच्याचा निषेध केला. 
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याव शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com