उपमहापौरपदासाठी भाजपचा बी प्लॅन, शिवसेनेचे मात्र विचारमंथन सुरू

 उपमहापौरपदासाठी भाजपचा बी प्लॅन, शिवसेनेचे मात्र विचारमंथन सुरू

औरंगाबाद : भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नव्याने या पदासाठी येत्या 31 डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. अवघ्या चार महिन्यांसाठी असलेले उपमहापौरपद मिळावे यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. औताडे यांच्या राजीनाम्यावरून भाजपमध्ये दोन गट पडल्यामुळे आता थेट उमेदवार न देता शहर विकास आघाडीचे गजानन बारवाल यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेल्याचे समजते. तर उपमहापौरपद कॉंग्रेसला द्यायचे की नाही? यावर शिवसेनेत अद्याप मंथन सुरू आहे. 

शहरातील 1680 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला नव्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याचा आरोप करत भाजपने शिवसेनेविरुध्द दंड थोपटले होते. भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली होती. मात्र औताडे यांनी दिलेला राजीनामा हा पक्षाला न विचारताच दिल्यामुळे भाजपची गोची झाली. महापौरांनी देखील राजीनामा स्वीकारून भाजपला कात्रीत पकडण्याची यशस्वी खेळी केली. 

आता उपमहापौरपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 31 डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान घेतले जाणार आहे. राजीनामा दिल्यामुळे भाजपला आता थेट उमेदवार देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यावर शहर विकास आघाडीचे आणि सध्या भाजपसोबत असलेले गजानन बारवाल यांना उमेदवारी देत निवडणुक लढवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. तर दुसरीकडे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता महापालिकेत शिवसेनेने आघाडीचा धर्म पाळत कॉंग्रेसला उपमहापौरपदाची संधी द्यावी अशी मागणी केली आहे. यावर शिवसेनेकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. उद्या या संदर्भातला निर्णय जाहीर केला जाईल असे आमदार अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे. 

कॉंग्रेसला वेटींगवर ठेवणार? 
चार महिन्यांसाठीचे उपमहापौरपद देखील शिवसेनेकडे राहावे अशी स्थानिक नेत्यांची इच्छा असल्याची देखील चर्चा आहे. महापालिकेत भाजपसोबतची युती ही 2014 मध्येच ठरली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सोबत येणारी महापालिका निवडणुक एकत्रित लढवावी आणि त्यानंतर कॉंग्रेसला सत्तेत सहभागी करून घ्यावे असा एक मतप्रवाह शिवसेनेत असल्याचे बोलले जाते. कॉंग्रेसची यावर सहमती मिळवण्यात यश आले तर उपमहापौरपद देखील शिवसेना आपल्याकडेच ठेवण्याच्या तयारीत आहे. उमेदवारी अर्ज घेत तसे संकेतच शिवसेनेने दिले आहेत. 

महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमने देखील उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. परंतु खासदार इम्तियाज जलील यांनी आम्हाला चार महिन्यांच्या उपमहापौर पदात रस नाही, पाच वर्षांची सत्ता पाहिजे असे म्हणत सगळ्यांनाच धक्का दिला आहे. एमआयएमने उमेदवार न देता मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली तर त्याचा थेट फायदा शिवसेनेलाच होणार आहे. त्यामुळे ऐनवेळी एमआयएम काय निर्णय घेते यावर उपमहापौरपदाची निवडणुक चुरशीची होणार की एकतर्फी हे ठरेल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com