शिवसेना-भाजप इच्छुकांच्या युतीच्या निर्णयाकडे नजरा

शिवसेना-भाजप इच्छुकांच्या युतीच्या निर्णयाकडे नजरा

औरंगाबाद : युती होणार, की दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार ? या चर्चेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यातून पूर्णविराम दिला आहे. युती होणार हे स्पष्ट करतांनाच त्यांनी "गद्दारी, हरामखोरी, बंडखोरी' खपवून घेणार नाही असा दम देखील शिवसेनेतील इच्छुकांना दिला आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या इच्छुकांचा मात्र यामुळे हिरमोड झाला आहे. आता जिल्ह्यातील दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या नजरा युतीची अधिकृत घोषणा आणि उमेदवारांच्या याद्यांकडे लागल्या आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर शिवसेना-भाजपच्या इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली होती. गेली पाच वर्ष सत्तेवर असल्यामुळे सर्वाधिक इच्छूक या पक्षांकडे होते हे इच्छुकांच्या मुलाखतीच्या वेळी स्पष्ट झाले होते. एकेका मतदारसंघात दहा ते बार इच्छूक तयार झाल्यामुळे सहाजिकच उमेदवारी कुणाला द्यायची हा प्रश्‍न वरिष्ठ नेत्यांना पडणार आहे. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यामुळे अगदी तेव्हापासून शिवसेना-भाजपचे इच्छूक आपापल्या मतदारसंघामध्ये कामाला लागले होते. काहींनी भाजपची वाट धरली तर अनेकांनी बंडाचे निशाण फडकावण्याची तयारी सुरू केली. पण लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची युती झाली आणि इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वेळोवेळी युती होणार असल्याचे संकेत दिले होते. 

पण काही तरी बिघडेल आणि युती तुटेल अशी भाबडी अशा बाळगून असलेल्या अनेकांनी जिल्ह्यात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. आता युतीची अधिकृत घोषणा आणि उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर इच्छूक तलवार म्यान करतात, की मग बंडखोरी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
शहरात बंडखोरीचा फटका ? 
शहरातील पूर्व, पश्‍चिम आणि मध्य या तीन मतदारसंघांचा विचार केला, तर पश्‍चिम आणि मध्यमध्ये शिवसेनेला बंडखोरीचा फटका बसण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उमेदवाराविरुध्द भाजप इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. जागा वाटपात युतीचे नेते यावर काय मार्ग काढतात हे पहावे लागेल. शहराप्रमाणेच ग्रामीणमधील सिल्लोड, गंगापूर, कन्नड, फुलंब्री या मतदारसंघामध्ये बंडखोरीचा भडका उडू शकतो. युतीमध्ये अनेक मतदारसंघातील चित्र गेल्या निवडणुकीनंतर बदलले आहे. शिवसेनेकडे असलेला गंगापूर, भाजपकडे असलेला सिल्लोड-सोयगांव मतदारसंघ या निवडणुकीत कुणाच्या वाट्याला येतो यावर देखील बरेचसे अवलंबून आहे. गंगापूर मतदारसंघात सध्या भाजपचे आमदार आहेत, तर कॉंग्रेसकडे असलेला सिल्लोड मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्‍यता आहे. या दोन्ही मतदारसंघांची अदलाबदल झाली तर इथे बंडखोरी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com