भाजप शिवसेना युतीच्या चर्चेने औरंगाबादमधील इच्छुक चिंतेत

 भाजप शिवसेना युतीच्या चर्चेने औरंगाबादमधील इच्छुक चिंतेत

औरंगाबाद : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेनेने, आणि आले तर तुमच्या सोबत अन्यथा, तुमच्या शिवाय असे राणाभीमदेवी थाटात सांगणाऱ्या शिवसेना-भाजपला पुन्हा युतीचे उमाळे फुटायला लागले आहेत. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांपासून चंद्रकांत पाटलांसारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी देखील शिवसेनेला युतीसाठी टाळी देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरातील पुर्व, पश्‍चिम आणि मध्य या तिन्ही मतदारसंघातील इच्छुकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

राज्याच्या सत्तेत असून देखील सुरुवातीपासून शिवसेनेने भाजपला विरोध करत आम्ही जनतेच्या बाजूने असल्याचे चित्र निर्माण केले होते. महागाई, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, काळा पैसा, नोटाबंदी ते थेट राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करत शिवसेनेने भाजपची पंचाईत केली आहे. त्यामुळे काहीही झाले तरी शिवसेना आता माघार घेणार नाही असा ठाम विश्‍वास शिवसैनिकांना अजूनही आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षातील इच्छुकांनी जोरदार तयारी केली. 

पण गेल्या काही दिवासांपासून भाजपने युतीसाठी शिवसेनेला टाळी देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर भाजपला टोकाचा विरोध करत शिवसेनेने आपले महत्व वाढवण्याचे धोरण अवंलबले आहे. युती करायची तर लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये करा, अन्यथा स्वबळाचा नारा कायम ठेवण्याचा शिवसेनाचा विचार असल्याचे सांगितले जाते. 

तनवाणी, वैद्य, गायकवाडांचे काय होणार? 
पण जसजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसे पुन्हा एकमेकांना गोंजारण्याची आणि युतीसाठी साद घालण्याचे प्रयत्न राज्य व राष्ट्रीय स्तरावरून सुरू झालेत. फडणवीस, दानवे आणि चंद्रकांत पाटील हे भाजपचे नेते त्यात आघाडीवर आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादीची आघाडी निश्‍चित झाल्यामुळे तर युतीसाठीच्या घडामोडींना अधिक वेग आला आहे. इकडे नेते युतीच्या तयारीला लागल्यामुळे इच्छुकांचे मात्र मनसुबे उधळले जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नेत्यांना युती हवी आहे, तर इच्छुक ती होऊ नये यासाठी देव पाण्यात घालून बसल्याचे बोलले जाते. 

शहरातील पुर्व मतदारसंघ युतीमध्ये भाजपच्या वाट्याला येतो. पण स्वबळ आणि 2014 चा अनुभव लक्षात घेता शिवसेनेचे नगरसेवक व विद्यमान महापालिकेतील स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांनी तीन वर्षापासून या मतदारसंघात काम सुरू केले आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडेच पाहिले जाते. पण युती झाल्यास त्यांच्या तीन वर्षाच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची शक्‍यता आहे. अशीच काहीशी परिस्थिती पश्‍चिम आणि मध्य या दोन मतदारसंघाची देखील आहे. पश्‍चिम मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. संजय सिरसाट इथून दोनवेळा निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत युती तुटल्यापासून इथे भाजपने अनेक इच्छूक निर्माण करत त्यांना कामाला लावले. 

सिरसाट यांचे एकेकाळचे स्वीय सहायक बाळू गायकवाड यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना तयारी करण्यास सांगण्यात आले होते. या शिवाय भाजप नगरसेवक व हरिभाऊ बागडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे राजू शिंदे हे देखील पश्‍चिम मधून लढण्यास इच्छूक आहेत. दोघांनीही आपापल्या परीने मतदारसंघाची बांधणी केली आहे. 
औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ भाजपकडे खेचण्यासाठी गेल्यावेळी पराभूत झालेले किशनचंद तनवाणी यांनी कंबर कसली आहे. मतदारसंघात विविध कार्यक्रम घेत त्यांची तयारी अंतिम टप्यात आलेली असतांना युती त्यांच्यासाठी धोक्‍याची घंटा ठरण्याची शक्‍यता आहे. युतीत हा मतदारसंघ देखील शिवसेनेकडे आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या भांडणात मध्यची जागा एमआयएमने जिंकली होती. 


नेते ठरवतील ते : तनवाणी 
युतीचा निर्णय झाला तर तो एकट्या औरंगाबाद किंवा मध्य मतदारसंघापुरता होणार नाही. पक्षाने शहर व जिल्ह्यात काय तयारी केली आहे हे नेत्यांना माहित आहे. त्यामुळे युती संदर्भात नेते जे ठरवतील ते आम्हाला मान्यच असेल. युती झाली तर जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे तिथे त्याचे काम करू. वैयक्तिक मला उमेदवारी मिळण्यापेक्षा राज्यात सत्ता येणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. 

युती होईल असे वाटत नाहीः राजू वैद्य 
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात देखील त्यांनी हे स्पष्ट केले आहे. पूर्व मतदारसंघात मी गेल्या तीन वर्षापासून काम करतो आहे. आजघडीला पूर्वमध्ये शिवसेनेची संघटना बांधणी मजबूत झाली आहे. केवळ माझ्या मतदारसंघात नाही तर स्वबळाच्या घोषणेनंतर राज्याच्या 288 मतदारसंघात शिवसेनेच्या इच्छूकांनी तयारी केली आहे. त्यामुळे युती होईल असे वाटत नाही. पण वरिष्ठ पातळीवर निर्णय झालाच तर पूर्व मतदारसंघ शिवसेनेला सोडावा असा प्रस्ताव देऊ. अन्यथा पक्ष ठरवेल त्या दिशेने काम करू. 

पक्षाचा निर्णय मान्य असेलः बाळू गायकवाड 
पश्‍चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मी इच्छूक आहे. गेल्या दोन अडीच वर्षात भाजपच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. परंतु युतीत किंवा स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय हा राज्याचे हित डोळ्यासमोर ठेवून आमचे नेते घेतील. त्यामुळे जो काही निर्णय होईल तो मान्य असेल, जी जबादारी दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडू. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com