shivsena agitation | Sarkarnama

गृहराज्यमंत्र्यांनी लावलेली मुख्यमंत्र्यांची पोस्टर्स शिवसेनेने फाडली ! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जून 2017

कर्जमाफी न करता भाजपच्या मंत्र्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभुल करण्यात येत असुन भाजप नेत्यांचा हा प्रकार म्हणजे "मूल होण्याआधीच पेढे वाटणे' असा असल्याचा हल्लाबोल शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी केला आहे. 

अकोला : कर्जमाफीचा निर्णय घेण्यापुर्वीच भाजपच्या पालकमंत्र्यांकडून शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या आभाराच्या पोस्टरवरून नवा वाद रंगला आहे. कर्जमाफी न करताच भाजप नेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप करीत गुरूवारी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर शेण फेकून पोस्टर्स फाडली. 

राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पेटला असून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, इतर शेतकरी संघटनांकडून कर्जमाफीच्या मुद्यावर रान पेटविले जात आहे. कर्जमाफीच्या मुद्यावर भाजप सरकारकडून शेतकऱ्यांच्या अडवणुकीचे धोरण राबविण्यात येत असल्याने केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेकडूनही आक्रमक होत भाजपला कोंडीत पकडण्यात येत आहे. कर्जमाफीचा निर्णय होण्याआधीच अकोल्यात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कर्जमाफी केल्याद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभाराचे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावले आहेत. या पोस्टरवरून आता नवा वाद रंगला आहे. 

कर्जमाफी न देता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार भाजप नेत्यांकडून होत असल्याचा आरोप करीत गुरूवारी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, सहाय्यक संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या नेतृत्वात महानगराध्यक्ष अतुल पवनीकर, निवासी उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, तरूण बगेरे, महापालिकेतील गटनेते राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, सागर भारूका, अश्विन नवले यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिकांनी बसस्थानक चौकासह शहरात ठिक-ठिकाणी भाजप नेत्यांनी लावलेले पोस्टर फाडून सरकारचा निषेध केला. यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टवरील फोटोवर शेण फेकले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख