Shivsena again tricks bjp | Sarkarnama

हिंगोलीत शिवसेनेची भाजपला पुन्हा धोबीपछाड

मंगेश शेवाळकर :सरकारनामा वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

हिंगोली : जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी व कॉंग्रेसला सोबत घेत अध्यक्षपद पटकाविले असून भाजपला एकाकी पाडून पुन्हा एकदा धोबीपछाड दिले आहे. एकाकी पडलेल्या भाजपची अवस्था मात्र केवीलवाणी झाली. 

हिंगोली : जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी व कॉंग्रेसला सोबत घेत अध्यक्षपद पटकाविले असून भाजपला एकाकी पाडून पुन्हा एकदा धोबीपछाड दिले आहे. एकाकी पडलेल्या भाजपची अवस्था मात्र केवीलवाणी झाली. 

जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना व भाजपची युती होऊन दोन अपक्षांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली जाईल, असे बोलले जात होते. पालिका निवडणुकीत व जिल्हा परिषद निवडणुकीत मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेवरच टीका करण्याची एकही संधी भाजपने प्रचारामध्ये सोडली नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांची मने दुखावली गेली होती. याशिवाय वरिष्ठ पातळीवरही दोन्ही पक्षात चांगलीच धुसफूस सुरूच होती. त्यामुळे पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत भाजपला वेगळे पाडून शिवसेनेने सत्ता स्थापन केली. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीमध्येही हीच युती कायम राहणार असल्याचे निश्‍चित झाले होते.

भाजपला एकटे पाडण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी व कॉंग्रेसला जवळ केले. त्यामुळे निवडणुकीत एकमेकांवर तोंडसुख घेणारे निवडणुकीनंतर एकत्र आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या आहे. शिवसेनेचे पंधरा सदस्य, राष्ट्रवादीचे बारा व कॉंग्रेसचे बारा सदस्य साथीला घेत शिवसेनेने अध्यक्षपद घेतले. शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे यांना अध्यक्षपद मिळाले तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अनिल पतंगे यांना उपाध्यक्षपद मिळाले आहे. आता सभापतीपदाच्या निवडीमध्ये कॉंग्रेसला दोन सभापतीपद दिले जाणार आहे. तीन पक्षांच्या युतीमुळे भाजप मात्र एकाकी पडली आहे.
 जिल्हा परिषदेत प्रथमच दहा सदस्य विजयी झाले तरी त्यांना शिवसेनेने सत्तेपासून रोखण्यात यश मिळविले आहे. शिवसेना व भाजपच्या या कुरघोडीचा फायदा राष्ट्रवादी व कॉंग्रेसने मिळविला आहे. त्यामुळे कमी सदस्य संख्या असतानाही सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी व कॉंग्रेसचाच खऱ्या आर्थाने विजय झाला आहे. बारा सदस्य असलेल्या राष्ट्रवादीने उपाध्यक्षपद मिळविले तर एक सभापतीपद निश्‍चित केले आहे. तर कॉंग्रेसने दोन सभापतिपद निश्‍चित केले आहेत. आता जिल्हा परिषदेच्या सभापतिपदासाठी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. तर एकाकी पडलेल्या भाजपची अवस्था मात्र, अडचणीची झाली असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेतील या तीन पक्षांच्या युतीमुळे आगामी काळात ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शिवसेनेसोबतच राष्ट्रवादी व कॉंग्रेसचाही सहभाग होता हे सांगण्यास या दोन्ही पक्षांचे नेते मागेपुढे पाहणार नाहीत. तर काळातील निवडणुकीवर या युतीचा परिणामही होणार असल्याचे चित्र आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख