Shivsangram state president Rajendra Maske attacks Jaydatta Kshirsagar on reservation stand | Sarkarnama

मराठा आरक्षणाबाबत क्षीरसागरांना पुतना मावशीचा पान्हा : शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के यांची टीका

दत्ता देशमुख
सोमवार, 30 जुलै 2018

मराठा आरक्षण मागणीसाठी बीडमध्ये आयोजित लाक्षणिक धरणे आंदोलनात सहभाग घेऊन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी मागणीला पाठींबा जाहीर केला. तसेच, आपल्या ओबीसी असण्यावर आणि जातीचे मेळावे घेण्याबद्दल बोलणारे कुठे आहेत, देशात कि परदेशात असा टोला नाव न घेता आमदार विनायक मेटे यांना लगावला होता.

बीड : "मराठा आरक्षणाची ३२ वर्षांपासून मागणी असून त्यासाठी विविध आयुधांनी संघर्ष सुरु आहे. विधिमंडळात मराठा आरक्षणासाठी वैचारीक रणकंदन होत असतांना कायम दुर राहीलेले आमदार जयदत्त क्षीरसागर आताच का पाठींबा देत आहेत ?  मराठा आरक्षण दृष्टीक्षेपात असल्याने त्यांचे आरक्षणाचे प्रेम हे पुतना मावशीचा पान्हा आणि जुनाच ड्रामा आहे ," असा  आरोप शिवसंग्राम युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केला.

राजेंद्र मस्के  म्हणाले ," मराठा आरक्षणाच्या विविध आंदोलनात त्यांनी कधीच सहभाग घेतला नाही. परळी येथे 13 दिवसांपासुन सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनाकडे देखील पाठ फिरविली. सोमवारी मुंबईत मराठा आरक्षणा संदर्भात राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची महत्वपूर्ण बैठक असताना या बैठकीला दांडी मारून बीड मध्ये मराठा आरक्षणाचे कैवारी बनून धरणे आंदोलनाचा घाट घालुन काय साध्य केले?  मुंबईत पक्षाच्या बैठकीत मराठा आरक्षणा विषयी भूमीका विशद करण्याची गरज असतांना बीड मध्ये हे ढोंग कशासाठी केले?"

"  कायम मराठा जातीचा व्देष करून व सोईनुसार जातीय राजकारण करून आपले राजकीय पोळी भाजण्याचे काम चालु आहे. मराठा समाजाकडुन आरक्षणासाठी स्वयंस्फुर्तीने लढा सुरू झालेला आहे. या प्रश्‍नावर जिल्हयातील अनेक लोकप्रतिनीधींनी आरक्षणाच्या आंदोलनात सहभाग घेतला. पण क्षीरसागरांना हे शहाणपण सुचले नाही. क्षीरसागरांसाठी मराठा आंदोलन अडचणीचे ठरले आहे. मराठा आरक्षाणाच्या आंदोलनात तुम्ही उतरले तर ओबीसी लॉबी नाराज होईल अशी भिती त्यांच्या मनात असावी. "

" राज्य शासनाला मराठा समाजाला आरक्षण दयावेच लागेल. या संभाव्य आरक्षणाची चाहुल बहुदा तुम्हाला लागलेली दिसतेय, म्हणुनच पुतना  मावशीचा पान्हा हा जुना ड्रामा तुम्ही सुरू केला आहे. मराठा समाजावर तुमचे एवढेच प्रेम असेल तर तुमच्या संस्थेवरच्या मराठा कर्मचाऱ्यांना व शिक्षकांना गुलामासारखी वागणुक देणे थांबवा," असे आवाहनही  राजेंद्र मस्के  यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी बोलविण्यात येणाऱ्या विशेष अधिवेशनात तुमचे शब्दही मराठा समाजाला ऐकायला मिळावेत अशी अपेक्षा असल्याचेही म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख