शरद पवारांच्या काटेवाडीतही शिवसेनेची शाखा!

शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र सत्ता स्थापनेसाठी चर्चा करत असल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांतील संबंधांचा हा आढावा!
शरद पवारांच्या काटेवाडीतही शिवसेनेची शाखा!

बारामती शहर : राज्यातील बदलत्या सत्ता समीकरणात आता दोन भिन्न विचारधारा असलेले राष्ट्रवादी व शिवसेना हे पक्ष एकत्र येत आहेत. असे असले तरी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीचे किस्से सर्वश्रुतच आहेत. राजकारणापलिकडची ती मैत्री होती आणि बाळासाहेबांनंतरही उद्धव ठाकरे यांनी शरद पवार व बारामतीच्या बाबतीत पवार कुटुंबियांना न दुखावण्याचीच भूमिका सतत घेतली होती. 

शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली असली तरी बारामतीत शरद पवार यांच्या मूळ गावी म्हणजे काटेवाडी मध्ये 1986 मध्ये शिवसेनेची पहिली शाखा सुरु झाली. त्या नंतर शिवसेनेच्या तालुक्यात शाखाही निर्माण झाल्या, अनेकदा निवडणूकीत सेनेच्या उमेदवारांनी पवारांविरोधात दंडही थोपटले. मात्र आजवरच्या सर्व निवडणूकांमध्ये शिवसेनेच्या किंवा मित्रपक्षाच्या प्रचारासाठी ना बाळासाहेब ठाकरे कधी बारामती आले, ना उध्दव ठाकरे. युती असतानाही बारामतीला प्रचाराला यायच ठाकरे कुटुंबियांनी सातत्याने टाळले. 

सन 2014 मध्ये विधानसभेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या वतीने अँड. राजेंद्र काळे हे अजित पवार यांच्या विरोधात बारामतीत उमेदवार होते. त्या वेळेस उध्दव ठाकरे हे बारामती विमानतळावर विमानाने आले, येथून हेलिकॉप्टरने फलटणला सभेसाठी निघून गेले. काळे यांनी त्या वेळेस त्यांना बारामतीत छोटी सभा घेण्याची विनंती केली होती, मात्र पूर्वनियोजित दौ-यामुळे त्यांनी बारामतीत त्या वेळेसही सभा टाळली होती. 

स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनीही वालचंदनगरला एक सभा घेतली होती, तेथून ते बारामतीमार्गेच पुण्याला गेले. मात्र त्या वेळेस कार्यकर्त्यांचा सत्कार स्विकारण्यासाठीही बाळासाहेब ठाकरे बारामतीत थांबलेले नव्हते, असा इतिहास आहे. सुप्रिया सुळे यांच्या पहिल्या खासदारकीच्या निवडणूकीत तर बाळासाहेबांची सुळे यांना पाठिंब्याची भूमिका जगजाहीरच होती. दोन भिन्न पक्ष असले तरी पवार व ठाकरे कुटुंबातील सौहार्दाचे वातावरण कायमच उत्तम होते, या नव्या युतीच्या निमित्ताने ते अधिक घट्ट होईल, अशी चिन्हे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com