सत्तर वर्षात कॉंग्रेसने आणखी काय करायला पाहिजे होते ?- शिवराज पाटलांचा विरोधकांवर पलटवार

 सत्तर वर्षात कॉंग्रेसने आणखी काय करायला पाहिजे होते ?- शिवराज पाटलांचा विरोधकांवर पलटवार

औसा : "आमची सवय मी काय केले हे सांगण्याची नाही, तर लोकांच्या कल्याणासाठी जबाबदारीने काम करण्याची आहे. विरोधकाकडे आता मते मागण्यासाठी मुद्देच नाहीत ते सारखे म्हणत आहेत सत्तर वर्षात तुम्ही काय केले ? आम्ही जर सांगत बसलो तर ते सांगण्यासाठी निवडणुकीचा पूर्ण काळही कमी पडेल अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी भाजपवर पलटवार केला. आमदार बसवराज पाटील यांच्या प्रचारार्थ कासार सिरसी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. 

सत्ताधारी भाजपचा समाचार घेतांना शिवराज पाटील म्हणाले, सर्वजातीधर्मांना सोबत घेऊन चालणारा कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते पंचायतराज व्यवस्थेपर्यंत काम आम्हीच केले आहे. आमच्याच काळात अन्न सुरक्षा योजना, रोजगार हमी योजना, सहकारी सोसायट्या, माहिती तंत्रज्ञान विकसित झाले आणि पाच वर्षात तुम्ही काय केले हे सांगता येत नसतांना आम्हालाच तुम्ही काय केले असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कॉंग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, येथील लोकांना समान हक्क आणि स्वातंत्र्य मिळावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली, रोटी, कपडा, मकान यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले, कसेल त्याची जमीन करून दिली, भाक्रा- नानगल, जायकवाडी, उजनी सारखी धरणे बांधून सिंचनाच्या योजना राबविल्या. 

तीस कोटी लोकसंख्या असतांना देशात अन्नधान्याची कमतरता भासत असल्याने बाहेरून अन्न आयात करावे लागत होते. आता एकशे तीस कोटी लोकसंख्या होऊनही आपण अन्नधान्य निर्यात करतो. याचे मूळ कारण कॉंग्रेसने नवनवीन तंत्रज्ञान, औषधी, खते, यंत्र, पाणी, वीजेच्या बाबतीत ठोस पावले उचलली म्हणून हे शक्‍य झाले. ऐंशी टक्के गरीब लोकांना दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ देण्याची अन्नसुरक्षा योजना आणली, रोजगरहमीचा कायदा आम्हीच पास करून काम नसले तरी शंभर दिवसाचा रोजगार गरिबांना कसा मिळेल याचे नियोजन केले. कापूस पिकाला बियाणे जमिनीत पडल्याबरोबर हमीभाव जाहीर केला. ग्रामीण भागात सहकारी सोसायट्या निर्माण करून आधार दिला. आज जी वैज्ञानिक प्रगती दिसते आहे त्याचे जनक कॉंग्रेसचे राजीव गांधी आहेत. आणि तरीही आम्हाला विचारता तुम्ही काय केले म्हणून? असा संतप्त सवालही पाटील यांनी शेवटी विरोधकांना केला. 

जबाबदारीने मतदान करा - बसवराज पाटील 
यावेळी आपल्या भाषणात आमदार बसवराज पाटील म्हणाले, सरकारवर मोठी जबाबदारी असते आणि ही जबाबदारी कोण पेलू शकतो याचा विचार करून मतदान करा. आम्हाला जबाबदारीची जाणीव असल्यानेच गेल्या दहा वर्षात मतदारसंघात विकासाची चळवळ उभी केली. कॉंग्रेसचे विचारच या राज्याला आणि देशाला गतवैभव प्राप्त करून देऊ शकतात. त्यामुळे मतदारांनी मला साथ द्यावी आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही आमदार बसवराज पाटील यांनी सभेत बोलतांना दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com