अडवाणी आणि शिवराज पाटील यांच्यात काय साम्य आहे ?

 अडवाणी आणि शिवराज पाटील यांच्यात काय साम्य आहे ?

लातूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना कोणीतरी एक प्रश्न विचारला. तुम्ही वेळ कसा घालवता? त्यानंतर ते म्हणाले, मी उत्तमोत्तम पुस्तके वाचतो आणि तितकेच उत्तम चित्रपट पाहतो. सध्या माझेही तसेच सुरू आहे. मी पुष्कळ चित्रपट पाहतो. चांगली-चांगली पुस्तके वाचतो, असे साम्य माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनीच शनिवारी येथे उलगडले. 

निमित्त होते मानसरंग चित्रपट महोत्सवाचे ! सोसायटी फॉर वेलबिईंग अवेअरनेस ऍण्ड रिहॅबीलीटेशन (स्वर), अभिजात फिल्म सोसायटी आणि अंतरंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या वतीने आयोजित दोन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन चाकूरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, स्वर संस्थेचे अध्यक्ष व आयोजक डॉ. मिलिंद पोतदार, नाट्यस्पंदन संस्थेचे डॉ. अशोक आरदवाड, अभिजात संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील, सचिव श्‍याम जैन, संजय तुरोरीकर उपस्थित होते. 

चाकूरकर म्हणाले, लोकसभेचा अध्यक्ष असताना तेथील कामकाजाचे थेट प्रक्षेपण टेलिव्हिजनच्या माध्यमातून दाखवण्याचा निर्णय मी घेतला होता. हा निर्णय घेतल्यानंतर " "आता आम्ही टीव्हीवर गोंधळ पहायचा का', असा प्रश्न मला नागरिकांमधून विचारण्यात आला. त्यावर मी म्हणालो, गोंधळ झाला तर गोंधळ पहा. विचारपूर्वक चर्चा झाली तर तीसुद्धा पहा. पण विचारपूर्वक जे निर्णय घेतले जातात, त्याला माध्यमातून फारसे महत्व दिले जात नाही. गोंधळ केला की तोच लक्षात राहतो. त्यामुळे प्रसारमाध्यमेही गोंधळालाच अधिक वेळ देतात. काही नागरिक तर लोकसभेचे कामकाज टेलिव्हिजनवर दाखवायला सुरवात केल्याने सदस्य चांगले कपडे घालून येत आहेत, पण त्यांच्या वागणूकीत बदल झाला नाही, असेही सांगू लागले. पण आता वागणुकीत बराच बदल झाला आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. 

घरात कसे वागले पाहीजे, शेजाऱ्यांसोबत कसे बोलले पाहिजे, समाजात कसे वावरले पाहीजे... याचे शिक्षण आपल्याला सहसा कुठे मिळत नाही. अनेक चांगले विचार पुस्तकांतच राहून जातात. प्रत्यक्ष जीवनात ते उतरत नाहीत. त्यामुळे चित्रपटच जगायचे कसे हे सांगू शकतात. प्रबोधनाचे माध्यम म्हणूनही याकडे पहायला हवे. कारण पाहून आणि ऐकून शिकण्याची पद्धत वाढत आहे. त्या प्रकारचे तंत्रज्ञानही विकसित झाले आहे, असेही चाकूरकर यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com