शिवणे-खराडी रस्त्यासाठी महापौर व आयुक्त अॅक्टिव्ह मोडवर

शिवणे-खराडी रस्त्यासाठीच्या भूसंपादनाची प्रकरणे सध्या रखडली आहेत. हस्तांतरणीय विकास हक्क (टिडीआर) मिळण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होण्यास प्रदीर्घ कालावधी लागत असून महापालिकेतील विविध विभागांमधील समन्वयाअभावी भूसंपादन रखडले असल्याचे सामोरे आले आहे.
शिवणे-खराडी रस्त्यासाठी महापौर व आयुक्त अॅक्टिव्ह मोडवर

पुणे : शिवणे- खराडी रस्त्याची भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, म्हणून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गेल्या आठवड्यात बैठक घेतली. त्यात संबंधित अधिकाऱ्यांचा व्हॉटसअपचा ग्रूप तयार करण्याचा आदेश दिला आहे. या रस्त्याच्या प्रगतीचा आढावा दररोज द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे. पाठोपाठ आता महापौरांनीही या रस्त्यासाठी बैठक घेतल्यामुळे या रस्त्याच्या कामाला वेग आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 
रखडलेल्या शिवणे-खराडी रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या पाच विभागांमधील प्रत्येकी एका अधिकाऱ्याची "नोडल ऑफिसर' म्हणून नियुक्ती करण्याची सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशानसाला केली. तसेच या रस्त्याबाबत ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मुळा-मुठा नदीच्या पात्राजवळून जाणाऱ्या सुमारे 17 किलोमीटर अंतराच्या शिवणे-खराडी रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडले आहे. महापालिकेने त्यासाठी सुमारे 120 कोटी रुपये खर्च केले आहेत. मात्र, फक्त नऊ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित आठ किलोमीटर रस्ता भसूंपादन न झाल्यामुळे रखडला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर टिळक यांनी आयोजित केलेल्या बैठकीस नगरसेवक मंजूश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुद्धे, दीपक पोटे, जयंत भावे, राजाभाऊ बराटे, वृषाली चौधरी, सुशील मेंगडे, अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

शिवणे-खराडी रस्त्यासाठीच्या भूसंपादनाची प्रकरणे सध्या रखडली आहेत. हस्तांतरणीय विकास हक्क (टिडीआर) मिळण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होण्यास प्रदीर्घ कालावधी लागत असून महापालिकेतील विविध विभागांमधील समन्वयाअभावी भूसंपादन रखडले असल्याचे संबंधित नगरसेवकांनी नमूद केले. त्यामुळे पथ विभाग, भूसंपादन विभाग, बांधकाम नियंत्रण, विकास आराखड आणि विधी विभाग यांचे प्रत्येकी एक अधिकारी या रस्त्यासाठी नियुक्त करावेत, अशी सूचना महापौरांनी केली. तसेच मार्च 2018 पर्यंत हा रस्ता तातडीने पूर्ण करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही त्यांनी सांगितले. 

राजाराम पूल ते म्हात्रे पूल दरम्यानच्या रस्त्यावर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे या भागातील रस्ता तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. हा रस्ता दोन महिन्यांत पूर्ण होईल, असे पथ विभागातर्फे बैठकीत सांगण्यात आले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com