छत्रपतींच्या जिल्ह्यात आम्हीच सरकार!

कोणाचेही सरकार असले तरी आम्हाला काहीही फरक पडत नाही. आमची कामे कधीही अडत नाहीत. कारण मी सर्वांशी संबंध जपलेले आहेत.
shivendraraje on chatrapati government
shivendraraje on chatrapati government

सातारा : कोणी त्यांचे सरकार आले म्हणून कामे होणार नाहीत, असे सांगत असेल तर ते चुकीचे असून सातारा जिल्ह्यात आम्हीच सरकार आहोत. हा छत्रपतींचा जिल्हा आहे, ते सरकार मुंबईत आहे. कोणता मंत्री येथे कामे करायला येणार नाही, अशी टीका  भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.

कुडाळ (ता. जावळी) जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अपक्ष उमेदवार मालोजीराव शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उदयनराजे, शशिकांत शिंदे आणि ऋषिकांत शिंदे यांच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका, मी इतका मोठा नेता नाही, असेही ठणकावले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शशिकांत शिंदेंच्या विरोधात काम करा असे सांगणारा एकतरी कार्यकर्ता दाखवा मी तिथल्या तिथे माफी मागतो. शशिकांत शिंदेंनी विधानसभा निवडणुकीत मला जावलीत मदत केली असे सांगितले जाते. मग हुमगांव, सोनगावात मते विरोधात कशी गेली, सरताळेत काय झाले? मी निवडणुकीत हा विषय कुठेही काढलेला नाही. शशिकांत शिंदेंनी यावर उत्तर द्यावे. ऋषीकांत शिंदे म्हणतात मीच त्यांना पाडले, आता शिंदेसाहेब म्हणतात की मीच पाडले. कुठेही न जाता मीच सगळ्यांना पाडत असलो तर मी लई मोठा नेता झालो. आहे का नाही गंमत. जावलीत बसून मीच सर्वांना पाडत असेल तर मी जिल्ह्यातील सर्वात मोठा नेता झालो. मुळात मी कोणाच्या मतदारसंघात लक्ष घालायला गेलेलो नाही. उलट ठरले त्याप्रमाणे काम केलेले आहे.

उदयनराजेंना मी माझ्या एका मतापुरता सांगत होते, बाकीच्यांच्या मतांचे मी सांगू शकत नाही, असे मी त्यांना उघडपणे सांगितले होते. त्यामुळे प्रत्येकाने पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नये. शशिकांत शिंदेंचे काही कार्यकर्ते मीच त्यांना पाडल्याचा प्रचार करत आहेत. हे सर्व खोटे असून यामध्ये काहीही संबंध नाही. माझे मन साफ असून असेल तिथे खरे खोटे करण्यास मी तयार आहे. त्यामुळे मालोजी शिंदे यांना कुडाळ गटातून निवडून द्या. ते अपक्ष असून त्यांनी राष्ट्रवादी सोडलेली नाही. ते स्थापनेपासून त्याच पक्षात आहेत. त्यांची इच्छा होती म्हणून आम्ही त्यांना पाठींबा दिला आहे. भाजपच्या लोकांनीही त्यांना मतदान द्यावे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com