येळगावकरांकडून शिवेंद्रराजेंच्या भाजपप्रवेशाचा मुद्दा अचानक उपस्थित, खुद्द राजांनीच व्यक्त केली नाराजी

 येळगावकरांकडून शिवेंद्रराजेंच्या भाजपप्रवेशाचा मुद्दा अचानक उपस्थित, खुद्द राजांनीच व्यक्त केली नाराजी

सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकास कामांवरील चर्चेऐवजी आमदार व नियोजन समिती सदस्यांतील वादावरून वादग्रस्त ठरली. भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आणि कऱ्हाड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यात बोलण्यावरून वाद झाला. या वादातून एकमेकांना सल्ले देताना डॉ. येळगावकर यांनी आम्ही कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, आता बाबा आमच्याकडे आलेत, असा सल्ला दिला. त्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी भाजप प्रवेश असा डिपीसीत (जिल्हा नियोजन समिती) ठरत असेल तर बरोबर नाही, अशी नाराजी व्यक्त केली. 

जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात झाली. बैठकीस जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ कैलास शिंदे, वनविभागाचे भगतसिंह हाडा, नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते. मात्र शंभूराज देसाई उपस्थित नव्हते. 

बैठकीस सुरवातीपासूनच डॉ. दिलीप येळगावकर आक्रमक होते. त्यांनी पालकमंत्र्यांनी विषय चर्चेला घेण्यापूर्वीच आपला विषय मांडला. सुरवातीला पालकमंत्र्यांनी त्यांना मी बोलण्याची परवानगी दिली नाही, असे सांगितले पण येळगावकरांनी त्याकडे दूर्लक्ष करीत आपला मुद्दा रेटला. जिल्हा परिषदेकडील दलित वस्तीविकास योजनेचा निधी अखर्चित राहिल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. तो मुद्दा सर्वच आमदारांनी उचलून धरला. पण दुष्काळाचा मुद्दा आमदार बाळासाहेब पाटील मांडत असताना डॉ. येळगावकरांनी मध्येच आपला मुद्दा रेटला. 

यावरून आमदार बाळासाहेब पाटील संतप्त झाले. त्यांनी येळगावकरांना रोखले. यावरून दोघांत खडाजंगी सुरू झाली. येळगावकरांनी त्यांना तुम्ही आता आलाय, दुष्काळ 20 वर्षापूर्वीपासून आहे, असे सुनावले. त्यावर बाळासाहेब पाटील यांनी मी 20 वर्षापासून येथे आहे, आमच्याकडेही दुष्काळ आहे. तुम्ही मधे मधे कशाला बोलताय. यावर येळगावकरांनी त्यांना आम्ही कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. आता आमच्याकडे बाबा आलेत, असे धमकावले. यावर मकरंद पाटील यांनी हस्तक्षेप करत ही बोलण्याची पध्दत बरोबर नाही, असे सुनावले, तर भाजप प्रवेश डिपीसीत ठरत असेल तर बरोबर नाही, असा मुद्दा आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला. 

वाद वाढल्याने पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करत येळगावकरांना आपण सत्तेत आहोत, सारखे सारखे मधे मधे लुडबुड करू नका, असे सुनावले. तर आमदारांकडे पहात आमदार आणि आपणच असे भांडत बसलो तर बाकीच्या सदस्यांनी काय करायचे, असा प्रश्‍न उपस्थित करून सर्वांना शांत केले. जिल्हा नियोजन समितीत झालेल्या या वादामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा भाजप प्रवेशाचा मुद्दा भाजपचे नेते डॉ. दिलीप येळगावकर यांच्या तोंडून आला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांसह नियोजन समितीतील भाजप व राष्ट्रवादीचे सदस्य ही अवाक झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com