shivendraje played major role | Sarkarnama

उदयनराजेंविरोधातील आक्रमकतेचा शिवेंद्रसिंहराजेंना फायदा 

उमेश बांबरे : सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 22 मार्च 2017

सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आमदार शशिकांत शिंदे यांचे वेगळे वजन आहे. पण जिल्हा बॅंकेतील उपोषणाच्या प्रकरणापासून ते थोडे शांत झाले आहेत. तसेच त्यांनी आपल्यातील आक्रमकपणा कमी करून मुद्‌द्‌याचेच बोलण्यावर भर दिला आहे. त्यामुळे रामराजेंनंतर शशिकांत शिंदे असे सूत्र आता बदलत असून शशिकांत शिंदेंची जागा शिवेंद्रसिंहराजे घेऊ लागल्याचे दिसत आहे. 

सातारा : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत ज्येष्ठ नेते रामराजेंनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले. खासदार उदयनराजे राष्ट्रवादीतून बाजूला झाल्यापासून शिवेंद्रसिंहराजे प्रचंड आक्रमक झाले असून त्याचा फायदा त्यांना होताना दिसत आहे. यापुढे त्यांचा हा आक्रमकपणा असाच राहिल्यास लोकसभा निवडणुकीत वेगळे चित्र पहायला मिळणार आहे. 

खासदार उदयनराजेंना बाजूला ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी निवडणूक लढवत सर्वाधिक यश मिळविले. यात विधान परिषदेचे सभापती रामराजेंचा मोठा वाटा आहे. त्यांच्याच रणनितीतून पक्षाने जिल्हा परिषदेच्या 40 जागा जिंकल्या तर अकरा पंचायत समितीवर सत्ता मिळविली. या निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे किंगमेकर ठरले.

पक्ष प्रमुख शरद पवारांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारप्रारंभावेळी खासदारांना बाजूला ठेवून निवडणूक लढण्याची सूचना सर्वांना केली होती. त्यानुसार आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंशी दोन हात करत त्यांना अंगावर घेतले. एकूणच पवारांच्या सभेनंतर शिवेंद्रसिंहराजे सर्वाधिक आक्रमक झाले. त्यांच्या या आक्रमक प्रतिमेचा त्यांना या निवडणुकीबरोबरच पदाधिकारी निवडीत ही फायदाच झाला. जावली तालुक्‍यातील ग्रामीण भागाने आमदारकीच्या निवडणुकीत सर्वांत जास्त मते शिवेंद्रसिंहराजेंना दिली होती. यातून उतराई होताना शिवेंद्रसिंहराजेंनी थेट शरद पवारांशी फोनवरून बोलून जावळीसाठी उपाध्यक्षपद मिळविले.

खासदार उदयनराजेंविरोधातील भूमिका आणि आक्रमकता येथे कामाला आली. आजवर शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका शांत शांतच होती. पण मनोमीलन फिस्कटल्यानंतर व पत्नी वेदांतिकाराजेंच्या पराभवानंतर ते खऱ्याअर्थाने आक्रमक झाले. शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांचा हा आक्रमकपणा लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवल्यास यावेळेस राष्ट्रवादीचा खासदार बदलण्यास पक्षाला यश मिळू शकते. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख