Shivbhojan Meal Will be launched on Republic Day at District Head Quarters | Sarkarnama

26 जानेवारीला जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी शिवभोजन योजनेचा शुभारंभ : छगन भुजबळ

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

येत्या 26 जानेवारीला प्रत्येक जिल्हा मुख्यालया ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ होणार असून गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक व पदार्थाची गुणवत्ता राखून ताजे भोजन दिले जाणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मुंबई : येत्या 26 जानेवारीला प्रत्येक जिल्हा मुख्यालया ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन योजनेचा शुभारंभ होणार असून गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक व पदार्थाची गुणवत्ता राखून ताजे भोजन दिले जाणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

शिवभोजन योजनेसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात आज झाली. यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव, महेश पाठक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, ''शिवभोजन केंद्र चालविण्यासाठी शक्‍यतो जास्तीत जास्त महिला बचतगटांची निवड करण्यात येईल. केंद्र चालविणाऱ्या महिलांना व पुरुषांना व्यावसायिक संस्थेद्वारे प्रशिक्षण देण्यात येईल. त्यासाठीचे आवश्‍यक सॉफ्टवेअर सिस्टीम विकसित करुन सर्व भोजन केंद्राचे सनियंत्रण करण्यात येईल. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी स्वतंत्र किचनची व्यवस्था असेल. किचनमध्ये अन्नपदार्थ तयार करताना प्रदुषण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. स्वच्छतेचे सर्व निकष पाळले जातील.''

''केंद्र चालविणाऱ्या केंद्र चालकांचे प्रशिक्षणही घेतले जाईल. पिण्यासाठी स्वच्छ फिल्टर केलेले पाणी वापरले जाईल. तसेच अन्नपदार्थ तयार करण्यासाठी ही स्वच्छ फिल्टरल्ड पाण्याचा वापर केला जाईल. शिवभोजन घेणाऱ्यांसाठी स्वच्छ टेबल, खुर्च्यांची व्यवस्था असेल. आवश्‍यकतेनुसार फ्रिजचा वापर केला जाईल. तसेच राज्यात पहिल्या टप्प्यात 50 पेक्षा अधिक ठिकाणी शिवभोजन केंद्रांचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी करण्यात येणार आहे," असेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख