shivajirao moghe challenges modi | Sarkarnama

नैतिकता असेल तर मोदींनी दाभडीत यावे : शिवाजीराव मोघे यांचे आव्हान

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीपूर्वी 2014 मध्ये आर्णी तालुक्‍यातील दाभडीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्‍वासने दिलीत. मात्र, मागील पाच वर्षांत एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. देशवासीयांची एकप्रकारे फसवणूकच केली आहे. फसवणूक केली नसेल तर त्यांनी दाभडीत येऊन शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चा करावी, असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले.

येथील विश्रामगृहात  आयोजित पत्रकार परिषदेत मोघे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता.16) पांढरकवडा येथे येत आहे. माझ्याच मतदारसंघात येत असल्याने त्यांनी पांढरकवडा येथे न येता दाभडी येथे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अशी मागणी मोघे यांनी यावेळी केली.

नरेंद्र मोदी यांनी 20 मार्च 2014ला प्रचारादरम्यान दाभडी येथून "चाय पे चर्चा'हा कार्यक्रम घेऊन देशातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला होता व 20 प्रकारची आश्‍वासने दिली होती. निवडून आल्यानंतर दाभडीच्या विकासासाठी 50 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, अद्याप एक कोटीही आले नसल्याचे मोघे यांनी सांगितले. 

सिंचनाशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्घी नाही, असे असताना सुप्रिम कोर्टाने निर्णय देऊनही निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम पाच वर्षांत पूर्ण केले नाही. शेतकऱ्यांचा कळवळा दाखविणाऱ्या भाजप सरकारने हा प्रकल्प कॉंग्रेसचा आहे, म्हणून पूर्ण केला नसल्याचा आरोपही मोघे यांनी केला.

यवतमाळ जिल्ह्यात जून 2014पासून आजपर्यंत 1,357 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. भाजपच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्यात, हे दाखविण्यासाठी 50 टक्केच शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र ठरविण्यात आल्याचा आरोपही मोघे यांनी केला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभडीत येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून कोणती आश्‍वासने पूर्ण केलीत, याची माहिती द्यावी, असे आवाहन करून पंतप्रधान मोदी यांचा निषेध करणार असल्याचे शिवाजीराव मोघे यांनी शेवटी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख