मोदींवरील पुस्तकाचे भाजपकडून समर्थन, शिवाजी महाराजांचा अपमान केला नसल्याचा दावा...

....
मोदींवरील पुस्तकाचे भाजपकडून समर्थन, शिवाजी महाराजांचा अपमान केला नसल्याचा दावा...

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांबरोबर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा तुलना केल्याने शिवरायांच्याबद्दल भक्ती असलेल्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहे. संत संमेलनात "आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' नावाच्या पुस्तिकेचे प्रकाशन दिल्ली भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक व सध्या भाजपवासी झालेले जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. भाजपने मात्र यात शिवाजी महाराजांचा कोठेही अपमान झालेला नसल्याचे सांगितले. भाजपचे दिल्ली प्रभारी शाम जाजू यांनी सांगितले की ""छत्रपती शिवरायांचा अपमान कोणी करू शकत नाही व कोणी केला तर आम्ही ते सहनही करणार नाही'' 

दिल्ली भाजपच्या कार्यालयात काल धार्मिक संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यातच गोयल यांच्या पुस्तिकेचे प्रकाशन राघवानंद स्वामी व इतर संतमहंतांच्या उपस्थितीत करण्यात आले. जाजू यांच्यासह माजी खासदार महेश गिरी हेही उपस्थित होते. मोदींची शिवरायांशी तुलना भाजप नेत्यांनी करण्याचा हा पहिला प्रकार नाही. यापूर्वी दिवंगत अनिल माधव दवे, योगी आदित्यनाथ , विजय गोयल आदी भाजप नेत्यांनी असा प्रकार केला होता. आदित्यनाथ यांनी अशी तुलना केली तेव्हा शिवसेना नेते संजय राऊत यांनी गुजरात दंगलींचे उदाहरण देऊन ""शिवराय कधी दंगलींच्या राजकारणात नव्हते,'' अशा शब्दांत संताप व्यक्त केला होता. 

या पुस्तिकेत काय लिहीले आहे हे आपल्याला माहिती नसल्याचे गिरी यांनी सांगितले. मात्र गोयल यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला आहे. ते त्यांचा प्रत्याप्रत्यक्ष तरी अपमान कसा करतील असा सवाल त्यांनी केला. शिवराय हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहेत असे सांगून जाजू म्हणाले की चाणक्‍य, महाराणा प्रताप किंवा शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरूषांच्या नावाने आजच्या नेत्यांना ओळखले जाणे हा त्यांचा अपमान ठरत नाही. शिवराय ही एखाद्या कुटुंबाची किंवा राज्याची जहागीर नाही. ते भारताच्या सन्मानाचे अढळ मानबिंदू आहेत. पराक्रम, धाडस, निर्णयक्षमता या महाराजांच्या गुणांची झलक भाजप कार्यकर्त्यांना मोदींमध्ये दिसते हा शिवरायांचा अपमान कसा ठरतो. मोदींच्या विरोधात कोणी कितीही गरळ ओकली तरी ते या देशातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत हे वास्तव असल्याचेही जाजू म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com