shivaji maharaj and jay prakash goyal | Sarkarnama

शिवाजी महाराजांसोबत मोदींची तुलना करणाऱ्या लेखकावर गुन्हे दाखल करा - मराठा क्रांती मोर्चाची मागणी

राजेभाऊ मोगल
बुधवार, 15 जानेवारी 2020

पुस्तक प्रकाशन समारंभाची माहिती जय भगवान गोयल यांनी आपल्या ट्‌विटर अकाऊंटवर पोस्ट करत दिली होती. 12 जानेवारी 2020 रोजी दिल्ली येथील कार्यक्रमात महाराष्ट्रातील एक लोकप्रतिनिधी आणि श्‍याम जाजू यांच्या उपस्थितीत केले गेले. श्‍याम जाजू यांनी सदर पुस्तकाचं समर्थन करत मोदीं मध्ये शिवाजी महाराजांचे सगळे गुण आहेत असे म्हटले असल्यामुळे हा मुद्दाम छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा डाव असल्याचे सिद्ध होत आहे.

औरंगाबाद : "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' हे पुस्तक लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणाऱ्या जय प्रकाश गोयल या लेखकावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक सविस्तर निवेदन पाठवण्यात आले. तर पोलीस आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. "आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या लेखक-प्रकाशक आणि विमोचन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा आणि प्रसिद्ध केलेले पुस्तक जप्त करा असे या निवदेनात म्हटले आहे. 

याशिवाय लेखक प्रकाशक व कार्यक्रमाचे संयोजक यांच्यावरही गुन्हे दाखल करा अशी तक्रार मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेऊन केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे जेष्ठ समन्वयक राजेंद्र दाते पाटील, सतीश वेताळ, मनोज गायके, सुकन्या भोसले, रेखा वाहटूळे, रेणुका सोमवंशी, योगेश औताडे, विशाल वेताळ, अभिजीत काकडे, अमोल साळुंके, सुभाष सूर्यवंशी, नारायण औताडे, कल्याण व्यवहारे आदी उपस्थित होते. 

सकल जनाचे श्रद्धा स्थान, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना करणाऱ्या पुस्तकाचे लिखाण करून समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचा गुन्हा जय भगवान गोयल यांनी केला आहे. तसेच या पुस्तकाच्या लेखक-प्रकाशक आणि विमोचन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणे ही जनभावना असुन कोटी कोटी शिवप्रेमींच्या या प्रकारामुळे भावना दुखावल्या गेल्या आहेत. राष्ट्र निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अवमान असल्यामुळे उपरोक्त सर्वावर तात्काळ गुन्हे दाखल होणे हाच जनभावनांचा आदर ठरणार असल्याचे निवेदनात आणि तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात मनोज तिवारी, श्‍याम जाजू, महेश गिरी, हे व इतर उपस्थित होते. 

पुस्तक प्रकाशन समारंभाची माहिती जय भगवान गोयल यांनी आपल्या ट्‌विटर अकाऊंटवर पोस्ट करत दिली होती. 12 जानेवारी 2020 रोजी दिल्ली येथील कार्यक्रमात महाराष्ट्रातील एक लोकप्रतिनिधी आणि श्‍याम जाजू यांच्या उपस्थितीत केले गेले. श्‍याम जाजू यांनी सदर पुस्तकाचं समर्थन करत मोदीं मध्ये शिवाजी महाराजांचे सगळे गुण आहेत असे म्हटले असल्यामुळे हा मुद्दाम छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा डाव असल्याचे सिद्ध होत आहे. एखाद्या बाबत आदर असणे म्हणजे त्यांच कर्तृत्व मोठं आहे हे पण समजणें अयोग्य आहे . म्हणून याची खबरदारी घेऊन हे पुस्तक बाजारात येणार नाही याची तात्काळ व युध्द पातळीवर व्यवस्था होणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा जनक्षोभ निर्माण होऊ शकतो. 

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मालिन करण्याचाच हा डाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मियांना स्वराज्यात सामावून घेतले. शेतकऱ्यांच्या पिकालाही धक्का लागू दिला नाही, गोरगरिबांना आधार दिला. जनतेसाठी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही. सह्याद्री पेक्षाही मोठी विचारधारा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कोणाचीही तुलना होऊच शकत नाही. जय भगवान गोयल ट्‌विट करून स्वतः या पुस्तकाचे समर्थन केले आहे . परंतु दूरदर्शन वाहिनीवर मुलाखत देतांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव एकेरी घेणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगणे, त्यांचे वर्णन करणे, ही बाब निंदनीय असून "किताब वापस लेनेका सवाल ही नही' अशी गोयल याने केलेली दर्पोक्ती अत्यंत निंदनीय आहे. 

शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असून या पुस्तकाचे प्रकाशक तथा विमोचन समारंभात भाग घेणारा प्रत्येक व्यक्ती देखील या कृत्याच्या कटात सहभागी होण्यासारखेच असल्याचे देखील मराठा क्रांती मोर्चाने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. व्यक्तिगत राजकीय स्वार्थासाठी देशाला वेठीस धरणारे, धार्मिक तेढ निर्माण करणारे हे कृत्य असुन त्यावर कठोर उपाय योजने ही आमची मूळ मागणी आहे. उपरोक्त नमुद सगळ्यावर आणि विमोचन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच सदरचे पुस्तक तात्काळ परत घेऊन जप्त करण्याची प्रक्रिया हाती घ्यावी अशी मागणी देखील मराठा क्रांती शिष्ट मंडळाने केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख